कुशल बद्रिके बालपणीच्या आठवणीत रमला; म्हणाला, "साक्षात्कार झाला आणि बालपणात गेलो..."`
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुशल आपल्या कामाव्यतिरिक्त अनेक मजेशीर पोस्टमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असतो. कुशल मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. कायमच चर्चेत राहणार्या कुशलने इन्स्टाग्रमावर खास दिवाळीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने बालपणीची आठवण सांगितली आहे.
आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्याने एक खास कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की,
“वात जशी दिव्याला असते तशी ती फटाक्यांनाही असते, कधी कधी आपली मुलं सुद्धा आपल्याला वात आणतात पण ती वात पेटवता येत नाही. परवा माझ्या मुलाने भुई चक्र पेटवलं आणि आभाळात भिरकवलं, मग त्याच्या कानाखाली पेटवायला मी पुढे झालो तर त्या पेट घेतलेल्या “भुईचक्रातून” marval मधल्या dr. strange चं portal ओपन झालं आणि time travel करुन मीच माझ्या बालपणात गेलो. तेव्हा मी बालपणी लावलेल्या शोधांचा मलाच साक्षात्कार झाला.”
“आभाळात उडणारं रॉकेट रस्त्यावर आडवं लावलं तर जास्त मज्जा येते ह्याचा शोध लावणारा अंबरनाथचा Elon musk मीच, फुलबाजाच्या दांड्या वाकड्या करून पेटत्या फुलबाज्या झाडांवर टाकून Newton च्या gravity ला चटके देणारा तो मीच. सार्वजनिक शौचालयात गेलेल्या माणसाला आपला शत्रू समजून त्याच्या खिडकीत सुतळी बॉम्ब फोडणारा शिपाई मीच, श्रीकृष्ण मालिका पाहून शिशुपालाचा वध करायला भुईचक्राचं सुदर्शन चक्र करणारा मीच. तेव्हा माझे पप्पा आम्हाला असं लांबून फटाके फोडताना का बघायचे काही कळायचं नाही. आता मी तसाच लांब उभा राहतो आणि माझ्या मुलाने फोडलेल्या फटाक्याने कुणालाही इजा होऊ नये हे बघतो. “निसर्ग चक्राला वात नसते पण त्याचे चटके बसतात !”- सुकून.”