Vishakha subhedar expressed her fear sadness after pahalgam terror attack
चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि अगदी सोशल मीडियावरही एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे पहलगाम हल्ल्याची… या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. या २६ जणांमध्ये, दोन विदेशी, दोन स्थानिक आणि २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. २२ एप्रिलला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ने घेतली होती. पहलगाम हल्ल्यानंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कलाकार मंडळीही या हल्ल्याविषयी तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहे.
‘Raid 2’ वर सेन्सॉर बोर्डने चालवली कात्री, अजय देवगणचे आठ सेकंदांचे संवाद हटवले; बदलणार ‘हे’ शब्द!
सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्याबद्दल सुप्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री विशाखा सुभेदारने लिहिलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने ही लक्षवेधी पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री विशाखा सुभेदारने लिहिलंय की, “इंटरनेट, सोशल मीडिया सध्या सगळीकडे एकाच विषयावर बोलणं, सुरू आहे पहलगाम मध्ये घडलेली भयावह घटना! हिंसेला, आतंकवादाला वृत्ती जबाबदार की मती? “असं व्हायला नको!” “तसं व्हायला हवं” “ह्यांनी हे करायला हवं, त्यांनी तसं बोलायला हवं” पण ज्यांच्यावर तो प्रसंग ओढवला त्यांनी काय करायचं? आपलं माणूस गमावल्याचं दुःख, शोक करायचा आणि जाब विचारायचा तर तो कोणाला? ही गमावलेली माणसं येतील का परत? जात, धर्म, वर्ण, भेद त्याचं केलं जाणारं राजकारण अशा आणि बऱ्याच गोष्टी आहेत. पण एखाद्या निष्पाप माणसाला जीवे मारण्याची वृत्ती ही येते कशी आणि कुठून? ही शिकवण देणारे आणि ती आपल्या चांगल्याच साठी आहे हे मानणारे ह्यांना कसे थांबवायचे? आनंद आणि विरंगुळा मिळावा म्हणून गेलेले पर्यटक, त्याची ही अशी अवस्था व्हावी! हे सगळंच अस्वस्थ करणारं आहे. गर्दी दिसली की एक अनामिक भीती वाटते… खूप खदखद आहे मनात… राहून राहून सारखे तेच विचार येतात. समजा आपण त्या जागी असतो तर???”
अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर, सध्या अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेसह अनेक मराठी चित्रपट आणि नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशाखाचं नवीन नाटक ‘द दमयंती दामले’ रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘द दमयंती दामले’ या नव्या नाटकात विशाखा सुभेदार मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय पल्लवी वाघ-केळकर, सुकन्या काळण, सागर खेडेकर, संजीव तांडेल, वैदेही करमरकर, क्षितिज भंडारी, संजय देशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.