(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस २०२४ चा विजेता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो चाहत्यांचा लाडका रील स्टार सुरज चव्हाण आता पुरंदरचा जावई झाला आहे. पुरंदरच्या भिवरी येथील संजना गोफणे हिच्याशी त्याचा २९ नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे. त्याच्या लग्नाची नुकतीच तयारी सुरु झाली असून, सुरजने नवीन घरात गृहप्रवेश देखील केला आहे.सुरज लवकरच लग्न करणार असून, त्यापूर्वी त्याने त्याच्या नवीन घरात प्रवेश केला आहे. सुरज चव्हाणने गृहप्रवेशाचा एक सुंदर व्हिडीओ आणि नवीन घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच सुरजचे चाहते त्यांचे नवीन घरासाठी अभिनंदन करत आहेत.
अंकिता वालावलकरने देखील सुरजच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे अलिकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात अंकिताने सूरज आणि संजनाच्या केळवणाची तयारी खूप चांगल्या पद्धतीने सुरु केली होती. यावेळी अंकिताने फुलांची सजावट केली सूरज आणि संजनासाठी पुरी-भाजीचा बेत केला होता. आणि अंकिताने दोघांच औक्षण देखील केले, त्यानंतर दोघांनाही भेटवस्तू दिल्या. हा व्हिडिओ शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले ‘सूरज आणि संजना…सूरजचं केळवण.’
बारामती तालुक्यातील मूर्टी मोढवे येथील अतिशय सामान्य कुटुंबातील सुरज चव्हाण केवळ मोबाईलवरील रीलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला आहे. लहान वयातच वडिलांचे निधन त्यानंतर काही दिवसातच आईचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची त्यांच्यावर जबाबदारी पडली. मात्र त्याची आत्या आणि बहिणीने त्याला मोठा आधार दिला. कोरोनाच्या काळात हाताला काहीच काम नव्हते. त्यावेळी मोकळ्या वेळात सूरजचा भाचाने त्यास मोबाईलवर रील बनविण्यास शिकवले. त्यानंतर त्याने रील बनविण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच त्याच्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला.
सुरुवातीला त्याने करमणूक म्हणून काही रील बनवले. त्यास केवळ पुणे जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळाला.सूरजने बिग बॉसच्या घरातील ट्रॉफी जिंकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने जल्लोष केला होता. सूरजच्या यशाने आनंदित होऊन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला स्वखर्चाने बंगला बांधून देण्याचे जाहीर केले. आणि काही दिवसातच ते आश्वासन पूर्णही केले.






