Hazaar Vela Sholay Pahilela Manus (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला “शोले” या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे.
विश्चास मीडिया आणि एंटरटेन्मेंटचे राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो आणि कॉंसमीडिया एंटरटेन्मेंटचे सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट हे या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केले आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन,स्वरुप आनंद भालवणकर, वरुण लिखाते यांनी संगीत तर विनोद पाठक यांनी चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी निभावली आहे. शंकरैय्या दोराईस्वामी यांनी या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर, क्रिएटिव्ह डायरेक्टर शंकरैय्या दोराईस्वामी आणि विनोद पाठक आहेत.
‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच “शोले” या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होते. चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, बालकलाकार श्रीरंग महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून अभिनेते समीर धर्माधिकारी व आनंद इंगळे हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा नक्कीच मनोरंजक असून, या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे देखील वाचा- तब्बल 19 वर्षानंतर सिक्वल, ‘नवरा माझा नवसाचा 2′ चा मनोरंजक प्रवास 20 सप्टेंबरपासून
“शोले” चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच “शोले” चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. “शोले” चित्रपटाच्या याच आठवणींना “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” हा चित्रपट सलाम करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.