सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : मोहवून टाकणारे नाट्यसंगीत व कथक नृत्याचे आविष्कार यांमुळे पुण्यात नुकताच संपन्न झालेला श्रीमती जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव अविस्मरणीय ठरला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची माहिती संचालक श्री श्रीराम पांडे यांनी दिली.
पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या सुपुत्री दीप्ती भोगले, वर्षा जोगळेकर, मां अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य व मैहर घराण्याचे मुंबई स्थित प्रसिद्ध बासरीवादक पं. नित्यानंद हळदीपूर, जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर, नगरसेविका मीताली सावळेकर, सांस्कृतिक संचालनालयाच्या अधिकारी जान्हवी जानकर आदी मान्यवर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी यावेळी राग भीमपलासमध्ये ‘लगन मोरी लागे…’ ही मत्ता तालातील बंदिश गायली. यानंतर त्यांनी ‘जा जा रे अपने मंदिरवा…’ हा द्रुत ख्याल आणि सरगमगीत सादर केले. आपल्या शिष्या वेदवती परांजपे व आदिती नगरकर यांसोबत त्यांनी द्रुत सरगम गीत आणि संगीत स्वयंवर नाटकातील ‘स्वकुळ तारक सुता…’ हे नाट्यगीत देखील प्रस्तुत केले. विदुषी सानिया पाटणकर यांना अविनाश पाटील (तबला), माधव लिमये (संवादिनी), नितीन महाबळेश्वरकर व आदिती नगरकर (गायन व तानपुरा) अशी साथसंगत केली.
यानंतर नित्यानंद हळदीपूर यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी राग मारवा वाजविला. विलंबित एक तालातील गत, द्रुत तीन ताल, छोटा ख्याल यांच्या सादरीकरणातून त्यांनी रागरूप उलगडले. पं नित्यानंद हळदीपूर यांना अंशुल प्रताप सिंग (तबला) व अमित चौधरी (तानपुरा) यांनी पूरक साथसंगत केली.
यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या आनंद भाटे यांनी नाट्यसंगीताची प्रस्तुती केली. संगीत मानापमान मधील ‘नयने लाजाविता…’, ‘नाही मी बोलत नाथा…’, ‘पतित तूं पावना…’, ‘खरा तो प्रेमा…’ आदी नाट्यगीतांच्या सादरीकरणाने भाटे यांनी महोत्सवाला एक उंची मिळवून दिली. त्यांना भरत कामत (तबला) आणि राहुल गोळे (ऑर्गन) यांनी पूरक साथसंगत केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप डॉ. माधुरी आपटे आणि सहकलाकार यांच्या कथक सादरीकरणाने झाला. ‘नमुनी ईश चरणा…’ या नांदीने त्यांनी सुरुवात केली. यानंतर ‘कथकनृत्यातून नाट्यसंगीताचा वेध’ या संकल्पनेवर आधारित परिपूर्ण नृत्य सादरीकरणे त्यांनी केली.
महोत्सवाचा दुसरा दिवस गोविंद बल्लाळ देवल लिखित, मराठी रंगभूमी – पुणे निर्मित आणि दीप्ती भोगले दिग्दर्शित ‘संगीत संशयकल्लोळ’ या संगीत नाटकाच्या सादरीकरणाने अविस्मरणीय ठरला. या नाटकामध्ये चिन्मय जोगळेकर, भक्ती पागे, सुदीप सबनीस, अनुपमा कुलकर्णी, अपर्णा पेंडसे, विद्यानंद देशपांडे, निनाद जाधव, श्रद्धा सबनीस यांनी भूमिका साकारल्या असून, लीलाधर चक्रदेव व अभिजित जायदे या कलाकारांनी साथसंगत केली. रवींद्र कुलकर्णी व लक्ष्मण पाटील यांनी या नाटकासाठी संगीत मार्गदर्शन केले आहे. महोत्सवाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.






