 
        
        (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत एका गंभीर प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.आरए स्टुडिओत एकूण 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे.. पोलिसांनी खडकीची काच फोडून आत प्रवेश करून मुलांची सुटका केली. यावेळी रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.
रोहित आर्याने 17 मुलांना ओलीस ठेवण्यासाठी फुलप्रुफ प्लॅन आखला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, याच आरए स्टुडिओत त्याने अभिनेत्री ऋचिता जाधवलाही बोलावले होते. धक्कादायक बाब म्हणजे, ही माहिती खुद्द ऋचिता जाधवने उघडकीस आणली आहे.
मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने तिच्या सोशल मीडियावर काही स्टोरी शेअर केल्या आहेत. रोहित आर्यने काही दिवसांपूर्वी आरए स्टुडिओत येण्यासाठी फोन केला होता, असा दावा रुचिता जाधवने केला आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
रुचिता जाधवने सांगितले की, रोहित आर्यने मुलांचे अपहरण करणारी स्क्रिप्ट तयार केली होती आणि त्यात तिला शिक्षिकेचे पात्र निभवायचे असल्याचे सांगितले होते.
वृत्तवाहिनीशी बोलताना रुचिता म्हणाली की, “मला ४ ऑक्टोबर रोजी रोहित आर्यचा मेसेज आला होता. त्यात त्याने सांगितले की, मी एक चित्रपट करणार असून त्याबाबत बोलायचे आहे. त्याच दिवशी सायंकाळी आम्ही बोललो आणि सुमारे नऊ मिनिटे एकमेकांशी संवाद साधला. यावेळी रोहित आर्यने मला चित्रपटाची कथा ऐकवली.”
‘नतमस्तक’ मराठी चित्रपटाची पोस्टर लाँचद्वारे घोषणा, पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली
अभिनेत्रीने सांगितले की, रोहित आर्यने कथा अशी सांगितली, “एक भला माणूस त्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काही मुलांना ओलीस ठेवतो आणि सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो दहशतवादी नसतो, त्याला फक्त त्याचे म्हणणे मांडायचे असते.”
रुचिताने विचारले की, “माझी भूमिका काय असेल?” त्यावर रोहित आर्यने सांगितले की, तुझी शिक्षिकेची भूमिका असेल जी त्या मुलांबरोबर ओलीस ठेवली जाते.
रुचिताने सांगितले की, रोहित आर्यने २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या पवईमधील आरए स्टुडिओत ऑडिशन घेणार असल्याची माहिती तिला दिली होती. यासाठी त्याने पत्ता आणि मॅपही पाठवला होता. रुचिताने या संभाषणाचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला, परंतु कौटुंबिक कारणास्तव ती ऑडिशनला जाऊ शकली नाही.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
“माझ्या सासऱ्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे मला मुंबईला जाणे शक्य झाले नाही. सोमवारी रोहित आर्यचा मला मेसेज आला होता, ज्यात त्याने मुंबईत येण्याबाबत विचारले. मात्र सासऱ्यांच्या प्रकृतीचे कारण सांगून मी जाणे टाळले. यानंतर रोहित आर्यने मला १५ नोव्हेंबर नंतर भेटू, असा मेसेज पाठवला. पण त्यानंतर काल टीव्हीवर त्यांची बातमी पाहून धक्काच बसला.”






