राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती हा चित्रपट केवळ एक सिनेमा न राहता तो एका पिढीचा आवाज ठरला. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी २० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने पुन्हा एकदा या चित्रपटाचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव चर्चेत आला आहे. आमिर खान, सिद्धार्थ, शरमन जोशी, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी आणि सोहा अली खान यांच्या प्रभावी अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजला. रंग दे बसंतीने भारतीय चित्रपटसृष्टीत सामाजिक जाणीव असलेल्या सिनेमांना नवी दिशा दिली. तरुणाई, देशभक्ती, व्यवस्था आणि भ्रष्टाचार यावर थेट भाष्य करणारा हा सिनेमा त्या काळात धाडसी मानला गेला. मात्र, या धाडसाची किंमतही मेहरांना मोजावी लागली. चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काही वाद निर्माण झाले आणि काही ठिकाणी या चित्रपटावर बंदीही घालण्यात आली होती.
Matrubhumi : मनाला भिडेल असे आहे Battle Of Galwan चे नवीन गाणे, सलमान खानने जाहीर केली रिलीज डेट
चित्रपटाच्या २०व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर राकेश ओमप्रकाश मेहरांनी त्या काळातील अनुभव शेअर केले. ते म्हणाले, “रंग दे बसंतीवर बॅनही लावण्यात आला होता. मात्र आम्ही घाबरलो नाही. आम्ही अधिकाऱ्यांना चित्रपटाचा खरा उद्देश समजावून सांगितला.” त्यांनी सांगितले की त्या काळातील संरक्षणमंत्री प्रणब मुखर्जी यांनी हा चित्रपट पाहिला होता. दिल्लीमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे तिन्ही प्रमुख एका थिएटरमध्ये एकत्र येऊन हा सिनेमा पाहणे, हा क्षण चित्रपटासाठी ऐतिहासिक ठरला.
मेहरा पुढे म्हणाले, “नंतर प्रणब मुखर्जी भारताचे राष्ट्रपती झाले आणि त्यांनी या चित्रपटाचे खुलेपणाने कौतुक केले. यामुळे मला एक महत्त्वाचा धडा मिळाला. कथा सांगताना ती मंजूर होईल की नाही, याचा विचार करू नये. प्रामाणिक कथा सांगितल्या तर त्या शेवटी लोकांपर्यंत पोहोचतातच.” चित्रपटाच्या आशयाबद्दल बोलताना ते म्हणाले, “जर तुम्ही फक्त परिणामांचा विचार करत असाल आणि प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असाल, तर ते चुकीचे आहे. सामाजिक सिनेमा नेहमीच अस्तित्वात होता आणि पुढेही राहील. तो समाजातील प्रश्नांना वाचा फोडत राहील.”
PIFF 2026 मध्ये मराठी चित्रपट ‘बाप्या’चा डंका ! सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पटकावले तीन मानाचे पुरस्कार
रंग दे बसंतीची कथा काही निष्काळजी, आधुनिक विचारांच्या तरुणांभोवती फिरते, जे स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित एका डॉक्युमेंट्रीचा भाग बनतात. हळूहळू ते भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांच्या विचारांशी जोडले जातात आणि आजच्या व्यवस्थेतील भ्रष्टाचार व अन्यायाविरोधात उभे राहतात. त्यांच्या या प्रवासातून तरुणाईला प्रश्न विचारण्याची, जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. २० वर्षांनंतरही रंग दे बसंतीची ताकद कमी झालेली नाही. उलट, आजच्या काळात हा सिनेमा अधिकच समर्पक वाटतो. बॅनपासून राष्ट्रपतींच्या गौरवापर्यंतचा हा प्रवास केवळ एका चित्रपटाचा नाही, तर सत्य मांडण्याच्या धाडसाचा आणि सिनेमा माध्यमाच्या सामर्थ्याचा विजय आहे.













