'द साबरमती रिपोर्ट'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, पहिल्या विकेंडला कसा मिळाला प्रतिसाद ?
धीरज सरना दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा स्टारर चित्रपट गेल्या १५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज होऊन जेमतेम ३ दिवस झाले आहेत. तीन दिवसातील कमाई पाहता प्रेक्षकांकडून चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रातील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या विकेंडमधील कमाईचा आकडा समोर आला आहे. चित्रपटाने पहिल्या विकेंडला देशभरात किती रुपयांची कमाई केली, जाणून घेऊया…
हे देखील वाचा- या ६ चित्रपटांनी थिएटरऐवजी नेटफ्लिक्सवर केली धमाकेदार एंट्री, ओटीटीचे वाढले तापमान!
गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट शुक्रवारी (१५ नोव्हेंबर रोजी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने विकेंडच्या पहिल्या आठवड्यात ८ कोटींची कमाई केलेली आहे. ५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाची ओपनिंग खूपच संथ झाली. ओपनिंगची कमाई पाहता चित्रपटाला पहिल्या विकेंडमध्ये दिलासादायक प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने १.६९ कोटींची कमाई, दुसऱ्या दिवशी २.६२ कोटींची कमाई तर तिसऱ्या दिवशी ३.७४ कोटींची कमाई केलेली आहे.
चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरनाने केले आहे. चांगली कथा असूनही या चित्रपटाला प्री बुकिंगचा कोणताही फायदा झाला नाही. निर्मात्यांना विकेंडचा बऱ्यापैकी फायदा झाला. २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रातील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे कथानक आहे. विक्रांत मेस्सीने चित्रपटामध्ये एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. गुजरातमधील गोधरामध्ये, २७ फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेमुळे संपूर्ण देशात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले होते. गोधरा रेल्वे स्टेशनवरून निघालेली साबरमती एक्सप्रेस चेन ओढून थांबवण्यात आली होती. त्यानंतर या ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावण्यात आली होती. या आगीमध्ये, ५९ जणांचा होरपळून मृत्यू झाला.