फोटो सौजन्य - Social Media
या चित्रपटाची खास बाब म्हणजे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यांची ही दिग्दर्शक म्हणून पहिलीच फिल्म आहे. या चित्रपटात वीर दास स्वतः एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंगदेखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ऑफबीट अनाउन्समेंट व्हिडिओनेच या चित्रपटाबाबत चर्चा सुरू केली होती. त्यानंतर आता आमिर खान प्रोडक्शन्सने शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आमिर खान आणि वीर दास यांच्यात ट्रेलरच्या कटवरून झालेला हलकाफुलका, खटकेबाज वाद पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये वीर दास “यंग आणि क्रेझी” अंदाजाचा ट्रेलर कट दाखवण्याच्या बाजूने दिसतात, तर आमिर खान त्यांच्या सिग्नेचर “परफेक्शनिस्ट” टचसाठी आग्रही असतात. या गंमतीशीर चर्चेमुळे चाहत्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून, सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना आमिर खान प्रोडक्शन्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “यंग आणि क्रेझी व्हर्जन की परफेक्शनिस्टचा व्हिजन , कोणता कट बनेल फायनल कट? हे जाणून घेण्यासाठी उद्यापर्यंत थांबावं लागेल! हॅपी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर उद्या रिलीज.” या घोषणेनंतर आता प्रेक्षकांची नजर थेट उद्याच्या ट्रेलर रिलीजकडे लागली आहे.
आमिर खान प्रोडक्शन्सने यापूर्वी लगान, तारे जमीन पर, दंगल, सीक्रेट सुपरस्टार यांसारखे सामाजिक आशय आणि मनोरंजन यांचा समतोल साधणारे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ हा चित्रपटही काहीतरी वेगळं आणि मजेशीर घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वीर दास हे जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेले स्टँड-अप कॉमेडियन असून, त्यांनी गो गोआ गॉन, बदमाश कंपनी, दिल्ली बेली यांसारख्या चित्रपटांतून अभिनयाचीही चुणूक दाखवली आहे. विशेष म्हणजे दिल्ली बेलीनंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबत त्यांची ही दुसरी भागीदारी आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले असून, हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत मात्र, उद्या रिलीज होणाऱ्या ट्रेलरमधून ‘हॅपी पटेल’चा खरा रंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.






