फोटो सौजन्य: आरुषी निशंक इन्स्टाग्राम
चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करतो, असं सांगून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीची २ निर्मात्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे. त्या निर्मात्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीकडून तब्बल ४ कोटी रुपये उकळले आहेत. ही मुलगी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल यांची मुलगी अभिनेत्री आरुषी निशंक आहे. हिची दोन निर्मात्यांकडून फसवणूक करण्यात आली आहे.
आरुषीची फसवणूक करणाऱ्या निर्मात्यांचं नाव मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला असं आहे. दोघांवरही ४ कोटी रुपयांची फसवणूक, मानसिक छळ आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आरुषी निशंकचे पती अभिनव पंत यांच्यामार्फत डेहराडूनच्या राजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
“लग्न, घटस्फोट, चिंता अन्…”, असं काय म्हणाली करीना कपूर, बेबोची क्रिप्टिक पोस्ट हैराण करणारी
आरुषी निशंक हिचे ‘हिमश्री फिल्म प्रायव्हेट लि.’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस आहे. ती पेशाने अभिनेत्री असून निर्मातीही आहे. गेल्या वर्षी तिच्या संपर्कात मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला आले होते. त्यांनी तिला ते मुंबईचे रहिवाशी असून जुहू भागात असलेल्या ‘मिनी फिल्म प्रायव्हेट लि.’ नावाच्या प्रॉडक्शन हाऊसचे संचालक असल्याची तिला बतावणी केली. आपण या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली ‘आँखो की गुस्ताखिया’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही तिला सांगितले. शिवाय त्या चित्रपटामध्ये, शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत, असंही तिला सांगण्यात आले होते.
या चित्रपटातील प्रमुख भूमिका आरुषीला ऑफर करण्यात आली होती. जर तिने ही भूमिका साकारली तर तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड प्रसिद्धी आणि नफा मिळेल, असे आरोपी आरुषीला म्हणाले होते. जर चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करायची असेल ५ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे आरुषीला आरोपींनी सांगितले होते. शिवाय, चित्रपटाच्या नफ्यातील २० टक्के रक्कम आरुषीला देण्यात येईल. जर, चित्रपटाची स्किप्ट आवडली नाही किंवा भूमिका आवडली नाही तर गुंतवलेले पैसे वार्षिक १५ टक्के व्याजाने परत केले जातील, असेही तिला सांगण्यात आले होते. आमिषाला फसून आरुषी हिचा ‘हिमश्री फिल्म प्रायव्हेट लि.’ आणि ‘मिनी फिल्म प्रायव्हेट लि.’ यांच्यामध्ये ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सामंजस्य करार झाला.
करार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी १० ऑक्टोबर २०२४ रोजी, आरुषीने आरोपींना २ कोटी रुपये दिले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी १ कोटी आणि २७ ते ३० ऑक्टोबर या काळात आणखी १ कोटी असे एकूण 4 कोटी रुपये तिने आरोपींना दिले. आरुषीचा विश्वास बसण्यासाठी आरोपींनी चित्रपटाच्या सेटवर एक भव्य- दिव्य सोहळ्याचेही आयोजन केले होते, त्यांनी त्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनाही आमंत्रित केले होते. आरोपींनी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आरुषीला प्रमोट करण्याचे वचन दिले होते. त्यावेळी आरोपींनी आरुषीला वचन दिले होते की, प्रमोशन आणि स्क्रिप्ट अंतिम केल्यानंतर ते तिच्याकडून उर्वरित २ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता घेतील. परंतु त्या दोघांनीही ना तिचे प्रमोशन केले, ना चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल केली, ना तिला भूमिका देण्यात आली.
जेव्हा, आरुषीला आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने आरोपींकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. एवढेच नाही तर आरुषीला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची, तसेच खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकीही दिली. अखेर आरुषीने दोन्ही आरोपींविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.