(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच नावाची चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘वडापाव’! टिझर आल्यापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता प्रदर्शित झालेला धमाकेदार ट्रेलर त्या उत्सुकतेला आणखी हवा देतोय. नुकताच वडापाव’चा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख यांची खास उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यात अधिकच रंगत आली. कॉमेडी, भावनिक क्षण आणि नातेसंबंधांवर विचार करायला लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी भन्नाट मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ‘वडापाव’ हा केवळ चित्रपट नसून, सगळ्यांच्या नात्यांची आणि भावनांची गोड–तिखट चव अनुभवायला लावणारा प्रवास ठरणार आहे.
ट्रेलरमधून कौटुंबिक नात्यांचे गोड–तिखट वळणं, हास्याची खमंग फोडणी आणि भावनिक प्रसंगांचा स्पर्श प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. सिनेमागृहात प्रेक्षकांना हसवतानाच काही क्षण डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा नातेसंबंधांबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतो, हे ट्रेलर पाहूनच जाणवतं.
रितेश देशमुख म्हणतात, “‘वडापाव’ चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना माझ्या तोंडाला पाणी आलं. या चित्रपटात एक उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि अभिनय पाहायला मिळतोय. ‘वडापाव’च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा! प्रसाद ओक यांच्या शतकपूर्तीसाठी त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो. लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘वडापाव’लाही तसाच उत्तम प्रतिसाद मिळेल, याची मला खात्री आहे.”
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लक्झरी घरात ‘या’ व्यक्तीसाठी खास एक रूम
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “‘वडापाव’ म्हणजे प्रत्येक घराघरातल्या नात्यांची आणि भावनांची चव आहे. नाती जशी गोड–तिखट असतात, तसाच या सिनेमातला प्रत्येक क्षण आहे. ट्रेलरला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून मला खात्री आहे की, चित्रपट प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही तर डोळ्यांत पाणी आणून नातेसंबंधांबद्दल नव्याने विचार करायलाही भाग पाडेल. रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमुळे ट्रेलर लाँच सोहळा अविस्मरणीय झाला आणि आमचं मनोबलही दुणावलं.”
निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणाले, “रितेश देशमुखच्या उपस्थितीमुळे हा सोहळा संस्मरणीय झाला. ‘वडापाव’ची कथा प्रत्येक घराघरात पोहोचेल आणि नात्यांची खरी चव प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.”
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील एका दृश्यामुळे रणबीरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?
निर्माते निनाद बत्तीन म्हणाले, “प्रेम, नाती आणि विनोद यांचा छान संगम असलेली ही तिखट–गोड लव्हस्टोरी प्रेक्षकांना नक्की भावेल. त्यात आम्हाला अत्यंत कमाल टीम लाभली असल्याने त्याचे पडसाद सिनेमागृहात नक्कीच उमटतील.”
निर्माते अमित बस्नेत यांनी सांगितलं, “जसा वडापाव तिखट-चुरचुरीत तरीही चविष्ट लागतो, तसाच या चित्रपटाचा प्रवास आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरून चित्रपटालाही प्रेक्षक तितकंच प्रेम करतील.”
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांना या ’वडापाव’ची चव चाखता येणार आहे.