Vicky Kaushal Pays Tribute To Chhatrapati Sambhaji Maharaj With Unseen Chhaava Pic
अभिनेता विकी कौशल ‘छावा’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याने चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करण्याचं कारण म्हणजे, आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी… ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. आज शंभूराजांच्या हौतात्म्याला ३३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ‘छावा’फेम अभिनेता विकी कौशलने पोस्ट शेअर करत महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्याने काही तासांपूर्वीच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. महाराजांबद्दल शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, “११ मार्च १६८९ म्हणजे, शंभु राजे बलिदान दिवस… आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त मी त्या योद्ध्याला वंदन करतो, ज्यांनी शरणागतीपेक्षा मृत्यूची निवड केली. ते अकल्पनीय छळाला तोंड देत उभा राहिले आणि ते शेवटपर्यंत जगासाठी धैर्याने लढत राहिले. कलाकाराने साकारलेल्या काही निवडक भूमिका कायमच त्याच्याबरोबर राहतात आणि मी ही एक कलाकार म्हणून ‘छावा’ चित्रपटात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही त्यापैकी एक आहे. त्यांचा जीवनप्रवास हा केवळ इतिहास नाहीये, ती गोष्ट धैर्य आणि त्यागाची आहे… जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते. जिंदा रहे! जय भवानी, जय शिवाजी! जय शंभूराजे!” असं म्हणत विकीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, विकी कौशलने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. अभिनेत्याने महाराजांच्या भूमिकेसाठी जवळपास ७ ते ८ महिने मेहनत घेतली आहे. तर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या कथानकावर तब्बल ४ वर्षे काम केले आहे. अभिनेत्यासह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांवर सखोल अभ्यास करता आला, असं सर्वांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. विकी कौशलच्या सिनेकरियरमधील सर्वाधिक हिट चित्रपटाच्या यादीमध्ये अग्रगण्य असलेला हा चित्रपट १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपटाने आजवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे.
दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं आहे. २०२५ मध्ये ५०० कोटी कमावणारा ‘छावा’हा पहिला चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ चित्रपटाने देशामध्ये ६२०. ३ कोटींची घसघशीत कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ७०० कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. चित्रपटाची ही संपूर्ण कमाई २५ दिवसांची आहे. चित्रपटामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, डायना पेंटी, दिव्या दत्ता, प्रदीप रावत, संतोष जुवेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.