जागितक टीव्ही दिनानिमित्त झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर यांच्याशी खास बातचीत
कोणताही दिवस नाही अथवा घरातील अशी कोणतीही व्यक्ती नाही जी टीव्ही पाहत नाही. टीव्हीचा आविष्कार झाल्यानंतर घरातील सगळेच एकत्र पाहून हे क्षण मस्त घालवतात. आजही OTT आणि अन्य प्लॅटफॉर्म आल्यानंतर टीव्हीची क्रेझ कमी झालेली नाही. २१ नोव्हेंबर रोजी जागतिक टीव्ही दिन साजरा करण्यात येतो आणि या निमित्ताने आम्ही व्ही. आर. हेमा – चीफ चॅनेल ऑफिसर, झी मराठी यांच्याशी खास बातचीत केली आहे. टीव्हीसमोर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी नक्की कशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखली जाते आणि सध्याची बदलती आवड टीव्हीसाठी त्रासदायक ठरतेय का याबाबत मोकळेपणाने त्यांनी ‘नवराष्ट्र’शी चर्चा केली.
१. आजच्या डिजिटल फर्स्ट काळात ही ‘जागतिक टीव्ही दिन’ जल्लोषात साजरा केला जातो त्यावर तुमचे काय विचार आहेत. टीव्ही माध्यम लोकांना आपलेसे वाटावे यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी/ प्रयत्न असतात?
व्ही. आर. हेमा – चीफ चॅनेल ऑफिसर, झी मराठी यांनी सांगितले की, ‘आजच्या डिजिटल-फर्स्ट जगात ‘जागतिक टीव्ही दिन’ साजरा करताना मला नेहमी जाणवतं की टेलिव्हिजन हे माध्यम फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते आजही कुटुंबाला एकत्र आणण्याची आणि सामूहिक अनुभवांची नाळ जोडतं. OTT आणि मोबाईलच्या जगातही जेव्हा संपूर्ण कुटुंब एखादी मालिका, रिअॅलिटी शो किंवा त्यांचा आवडता कार्यक्रम एकत्र पाहतं, तेव्हा टीव्हीची ताकद पुन्हा जाणवते. त्यामुळे आमचा प्रयत्न कायम स्पष्ट आहे लोकांना त्यांच्या जीवनाशी जवळीक साधणारा, भावनिकदृष्ट्या प्रामाणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मुळाशी घट्ट असलेला कंटेन्ट देणे. उदाहरणार्थ, ‘लक्ष्मी निवास’ किंवा ‘वीण दोघातली ही तुटेना’ सारख्या मालिकेने कुटुंबातील नातेसंबंधांना दिलेली सखोलता प्रेक्षकांना आपलेसे वाटण्यास खूप मदत करते. तसेच ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या कार्यक्रमांनी लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील आनंद, विनोद आणि साधेपणा यांची सांगड घालते. आमचं ध्येय टीव्हीला केवळ स्क्रीन नाही तर घराचा सदस्य वाटेल असं करणं आहे.’
२. सध्याच्या मीडिया लँडस्केपमध्ये सामाजिक एकता, संस्कृती आणि सार्वजनिक माहितीमध्ये टेलिव्हिजनचे योगदान तुम्हाला कसे जाणवते?
सामाजिक एकता वाढवण्यात टीव्हीचे योगदान मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. कारण टीव्ही अजूनही तो प्लॅटफॉर्म आहे जो ग्रामीण-शहरी, युवा-वृद्ध, सर्व आर्थिक स्तरातील लोकांना एकत्र आणतो आणि त्यांच्यासमोर एकच कथा, एकच भावना ठेवतो. उदाहरणार्थ, गणेशोत्सव असो, दिवाळी असो किंवा गुढीपाडवा झी मराठी विविध विशेष सोहळ्यांद्वारे संपूर्ण महाराष्ट्राला सण एकत्र साजरी करण्याची संधी देते. संस्कृतीच्या दृष्टीनेही ‘मी मराठी. झी मराठी’ ही भावना आमच्या प्रत्येक कार्यक्रमात जाणवते. पारंपारिक लोककलेचे सादरीकरण असो, नातेसंबंधांची भावस्पर्शी मांडणी असो किंवा महाराष्ट्रातील विविध बोली-भाषांचा समावेश टीव्ही अजूनही संस्कृती टिकवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. सार्वजनिक माहितीच्या क्षेत्रातही सामाजिक संदेश, जागरूकता मोहिमा आम्ही “कमळी” , “तारिणी” सारख्या प्रेरणादायी कथा मधून जबाबदारीपूर्ण अतिशय प्रभावीपणे सांभाळल्या आहेत.
हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? कथित गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतच्या पोस्टने वेधले लक्ष
३. डिजिटल आणि ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मचे वर्चस्व वाढत्या जगात टेलिव्हिजनची भूमिका कशी विकसित होत आहे असे तुम्हाला वाटते?
डिजिटल आणि ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे टेलिव्हिजनची भूमिका बदलली असली तरी ती कमी झालेली नाही उलट अधिक ताकदीने विकसित होत आहे. आजचा प्रेक्षक विविध माध्यमांवर कंटेन्ट पाहत असला तरी, ‘इमोशनल कम्युनिटी व्ह्यूइंग’ ही गोष्ट आजही फक्त टीव्हीच देऊ शकतो. त्यामुळे आम्ही टीव्ही आणि डिजिटल यांची सांगड घालणाऱ्या हायब्रिड स्ट्रॅटेजीवर काम करत आहोत. उदाहरणार्थ, आमचे शो टीव्हीवर मोठ्या प्रमाणात पाहिले जात असतानाच ‘मराठी Zee5’ आणि डिजिटलवरही त्याचं एक्स्टेन्शन रूपात शॉर्ट क्लिप्स, बिहाइंड-द-सीन्स, कलाकारांशी संवाद यांसारखी अतिरिक्त सामग्री उपलब्ध करून देतो. त्यामुळे प्रेक्षक टीव्हीवर कथा अनुभवतात आणि डिजिटलवर त्या कथेशी जास्त जोडले जातात. पुढील काळात मल्टी-स्क्रीन अनुभव ही टीव्हीची नैसर्गिक प्रगती असेल.
४. येणाऱ्या काळात/ वर्षांत झी मराठीला अधिक सशक्त बनवण्यासाठी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी कोणत्या नव्या उपक्रमांची शक्यता तुम्हाला दिसते?
झी मराठीच्या २६ वर्षांच्या प्रवासात आम्ही अनेक ‘फर्स्ट-इन्-इंडस्ट्री’ उपक्रम केले आहेत आणि पुढील काळात त्याच नवोन्मेषी दृष्टिकोनाला अधिक विस्तार देण्याचे आमचे लक्ष्य आहे. उदाहरणार्थ, ‘कमळी’ या कार्यक्रमाचा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित होणं हा जागतिक स्तरावर मराठी कंटेन्टची ओळख निर्माण करणारा ऐतिहासिक उपक्रम होता. याचप्रमाणे, पुढील काळात आम्ही शिक्षण, समुदाय आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन या तिन्ही क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत पावले उचलण्याच्या तयारीत आहोत.
जसं की आमच्या मालिकांमधून केलेल्या शैक्षणिक उपक्रमांना लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ‘कमळी’ च्या माध्यमातून दुर्गम गावांतील मुलींना सायकलींचं वाटप करणं असो, किंवा ‘लक्ष्मी निवास’ मधील लक्ष्मी या पात्राने वंचित विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे हे उपक्रम प्रेक्षकांच्या भावनांशी जुळले आणि झी मराठीची ही लाडकी पात्रे फक्त आपल्या अभिनयानींच नाही तर अश्या उपक्रमांमुळे ही समाजात आदर्श निर्माण करत आहेत. याशिवाय, समुदायाशी प्रत्यक्ष संवाद साधणारे अनेक उपक्रम आम्ही सातत्याने करत आलो आहोत आणि ते पुढे वाढवण्याचा आमचा मानस आहे. ‘नव दाम्पत्यांची मंगळागौर’, ‘आम्ही सारे खवये जोडीचा मामला’, ‘गोविंदा आला रे’ आणि ‘मालिकांचा महासंगम’, अशा कार्यक्रमांनी लोकांमध्ये एक वेगळा आनंद, सहभाग आणि जवळीक निर्माण केली. समुदायाशी असलेली ही नाळ पुढील वर्षांत आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही विविध सांस्कृतिक, उत्सवी आणि कौटुंबिक कार्यक्रमांची आखणी करत आहोत.
५. पारंपारिक ग्रामीण प्रेक्षक आणि आधुनिक शहरी प्रेक्षक यांच्यात संतुलन साधण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलता? तसेच मालिकांची कंटेन्ट स्ट्रॅटेजी आखताना कोणते घटक महत्त्वाचे ठरतात?
ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांमध्ये संतुलन साधणे ही आमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि रणनीतीपूर्ण प्रक्रिया आहे. ग्रामीण भागातील मूल्ये, परंपरा आणि जीवनातील साधेपणा जितका प्रामाणिकपणे दिसला पाहिजे, तितकीच शहरी प्रेक्षकांना भावणारी आधुनिकता, करिअर, नात्यांतील सुसंवाद आणि प्रगत जीवनशैलीही कथांमध्ये असली पाहिजे. म्हणूनच आम्ही कथा, लोकेशन, भाषा आणि पात्रांमध्ये खरी मराठी ओळख कायम ठेवतो. उदाहरणार्थ ग्रामीण वास्तवावर आधारित ‘पारू’ आणि ‘कमळी’ आणि आधुनिकतेवर आधारित ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकांनी त्यांच्या प्रेक्षकवर्गाशी घट्ट नाळ जोडली. कंटेन्ट स्ट्रॅटेजी करताना खऱ्या भावना आणि मूल्ये जी गाव आणि शहरांमध्ये रुजलेली आहेत, अशा पात्रांची भावनिक प्रामाणिकता, सामाजिक वास्तव, कुटुंबाभिमुख मूल्ये आणि मनोरंजनाचे विविध फॉरमॅट्स हे सर्व महत्त्वाचे घटक आम्ही नेहमी लक्षात ठेवतो.
120 Bahadur Review: हृदय पिळवटून टाकेल असा आहे फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या काय आहे कथा?
६. आजची पिढी ज्यांना GenZ म्हणून ओळखलं जात त्यांना टेलिव्हिजन माध्यमाशी जोडून ठेवण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण प्रयत्न करत आहात? हा वेगळेपणा टिकवण्यासाठी तुमची मुख्य दृष्टी, आणि योजना काय आहे?
यावेळी व्ही. आर. हेमा यांनी सांगितलं की, ‘Gen Z प्रेक्षकांची आवड, गती आणि अपेक्षा खूप वेगळ्या आहेत, आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तितकीच नवी दृष्टी स्वीकारावी लागते. या पिढीला वेगवान, उत्साही आणि आधुनिक कथानक आवडतात, म्हणून आम्ही त्यांच्या जीवनशैलीशी जुळणाऱ्या थीम्सचा ही समावेश करण्याचा प्रयत्न करतो . सोशल मीडियावर इंटरऍक्टिव्ह कंटेन्ट, रील्स, डिजिटल बिहाइंड-द-सीन्स, आणि युवा कलाकारांशी थेट संवाद हे Gen Z ला टीव्हीशी अधिक जवळ आणणारे उपक्रम आहेत.’
पुढे त्या म्हणाल्या की, ‘आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सखोल संशोधन आणि ग्राहकांशी संपर्क साधत आहोत. समाजात आता घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकत आहोत जसं की कमळी मालिकेत आम्ही कॉलेज लाईफ मधील ड्रग चा विषय हाताळला. ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत आम्ही समाजात उशिरा होणाऱ्या लग्नाबद्दल बोलत आहोत. भविष्यात आमची दृष्टी स्पष्ट आहे आजच्या पिढीच्या उर्जेला आणि मराठी अभिमानाला जोडणारा कंटेन्ट देत राहणं, ‘मी मराठी झी मराठी ’ ही ओळख अधिक आधुनिक, इनोव्हेटिव्ह पद्धतीने सादर करणं ही जबाबदारी आम्ही पेलणारच आहोत’






