बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची जास्त आवश्यकता असते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे अचानक चक्कर येणे, कधी थकल्यासारखे वाटणे तर काहीवेळा अचानक रक्तदाब कमी होऊन जातो. उन्हाळ्यात बाजारामध्ये विविध फळे उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे लिची. लिची चवीला आंबटगोड लागते. या फळांमध्ये भरपूर पाणी असते. केवळ चावीलाच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी लिची फायदेशीर आहेत. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिचीचा आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया लिची खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात शरीरासाठी प्रभावी ठरेल 'हे' पाणीदार फळ, नियमित खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचेवर येईल चमक

लिचीमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी लिचीचा आहारात समावेश करावा.

वाढत्या उष्णतेमुळे त्वचेची हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी आहारात लिचीचा समावेश करावा. यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते.

गरम हवामानात शरीरासाठी उपयुक्त मानले जाणारे फळ म्हणजे लिची. यामुळे उष्माघाताचा धोका टाळता येतो. शरीर आतून स्वच्छ आणि थंड राहण्यास मदत होते.

वारंवार पचनक्रिया बिघडत असेल तर आहारात लिचीचा समावेश करावा. यामुळे वारंवार उद्भवणाऱ्या पोटाच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते.

मधुमेह असलेले रुग्ण सुद्धा लिचीचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीरावर फारसा परिणाम होत नाही.






