मुंबई आणि पुण्यासह कोकणी किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा इशारा (फोटो - istock)
Maharashtra Weather Updates : मुंबई : महाराष्ट्राला प्रचंड कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस असा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला 40 अंश पार चढलेला उन्हाच्या पाराने सर्वांच्या जीवाची लाही केली आहे. तर दुसरीकडे अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लावला आहे. मागील पाच दिवसांपासून उन्हाचा चटका जोरदार वाढलेला असताना कालपासून राज्यात हवामान (IMD Weather Update) बदल झाला आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या असून पूर्वमौसमी पावसाला पोषक असे हवामान तयार झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. सोमवारी वर्धा जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे देखील वाचा : ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा
तुमच्या शहरातील हवामान अंदाज काय?
उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पाच दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. त्यातच पुढील दोन दिवस मुंबईत पावसाची अधिक शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील ४८ तास पावसाळी वातावरण राहणार आहे.
हे देखील वाचा : मुंबईचा पाणीसाठा ३२ टक्क्यांवर! मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे आदेश
त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रसह कोकण मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिट होणार असल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता.
रात्री बरसल्या सरी
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काल सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अवकाळी पावसाने लोकांची तारांबळ उडाली असून चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.






