रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. याशिवाय आहारात मेथी, पालक किंवा शेपूच्या भाजीचे नेहमीच सेवन केले जाते. नेहमीच ठराविक पालेभाज्या न खाता लेट्यूसचे सुद्धा आहारात सेवन करावे. लेट्यूसची पाने सॅलड किंवा चिकन रॅप बनवताना वापरली जातात. या पानांमध्ये जीवनसत्त्वे अ, क, के, फोलेट, फायबर आणि लोह मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच शरीर डिटॉक्स करण्यासाठी लेट्यूसचे सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया लेट्यूस खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
आहारात करा लेट्यूसच्या पानांचे सेवन
वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक सॅलड किंवा स्मूदी बनवून पितात. सॅलड बनवताना त्यात लेट्यूसच्या पानांचा वापर करावा. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी लेट्यूसच्या पानांचे आहारात सेवन करावे. या पानांमध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरिया वाढून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लेट्यूसची पाने खावीत.
लेट्यूसमध्ये पोटॅशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब संतुलित ठेवतात.
हाडांच्या आरोग्यासाठी लेट्यूसची पाने प्रभावी ठरतात. यामध्ये विटामिन के आणि कॅल्शियम आढळून येते, ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत राहतात आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी लेट्यूसची पाने खावीत. यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा सुंदर दिसू लागते. याशिवाय अँटीऑक्सिडंट्स आणि क्लोरोफिल शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते.