रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा प्रभाव मेंदूवर लगेच दिसून येतो. त्यामुळे मेंदू कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. मेंदूच्या कार्यात बिघडत झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रोजच्या आहारात नेहमीच पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेंदूला तीक्ष्ण बनवण्यासाठी, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी आणि मानसिक तणाव थकवा दूर करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूंसह संपूर्ण शरीराचे कार्य सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)
मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ
मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले २ अक्रोड खावेत. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी असिड,विटामिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते.
हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन मेंदूसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे नियमित हळदीचे दूध किंवा हळदीचा वापर करून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. मेंदूमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आणि नवीन मेंदूच्या पेशी तयार करण्यासाठी हळदीचे सेवन केले जाते.
डार्क चॉकलेटमध्ये कोको फ्लेव्होनॉइड्स, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. यामुळे मेंदूची क्षमता सुधारण्यास मदत होते. मानसिक तणाव कमी होऊन मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बेरीज खायला खूप आवडतात. ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्सआढळून येतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशींचे कार्य सुधारण्यास मदत होते. स्मरणशक्ती सुधारण्यास आणि वयानुसार येणारी मानसिक कमजोरी टाळण्यासाठी बेरीज खावेत.
पालक, काळे, मेथी आणि ब्रोकोली इत्यादी भाज्यांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. या भाज्यांचे सेवन केल्यास मेंदूला अनेक फायदे होतील. पालेभाज्या खाल्ल्यामुळे मेंदूमध्ये वाढलेली जळजळ कमी होते.