विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याच्या अभिनयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून शिवजयंतीचेनिमित्त साधत अभिनेत्याने रायगडावर हजेरी लावली होती. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासहित लाख शिवभक्त कार्यक्रमाला हजर होते. दरम्यान, अभिनेता विकी कौशलने रायगडावरील शिवजयंती साजरा करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Vicky Kaushal Visits Raigad Fort On Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, रायगडावर 'छावा' चित्रपटानिमित्त अभिनेता विकी कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्याने आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी महाराजांच्या पुतळ्याला फार घालत अभिवादन केले आहे.
यावेळी सोहळ्याला पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही हजेरी लावली होती. पालकमंत्र्यांनी अभिनेत्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट म्हणून दिली. यावेळी विकीने खास मराठमोळा लूक वेअर करत सोहळ्याला हजेरी लावली होती. विकीच्या आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या डोक्यावरील फेट्याने कार्यक्रमामध्ये सर्वांचेच लक्ष वेधले.
दरम्यान, विकी एका चिमुकलीच्या डोक्यावरील फेटा सेट करताना दिसत आहे. चाहतीचा विकीसोबतचा क्यूट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विकीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जात असून चाहत्यांचा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्याचा कल सर्वाधिक आहे.
"आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर अभिवादन करण्याचे भाग्य लाभले. रायगडावर येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती आणि महाराजांचे आशीर्वाद घेण्याची यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. तुम्हासर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू |" असं कॅप्शन देत अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता विकी कौशलसह चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. या दरम्यानचे फोटो विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही तासांपूर्वी शेअर केले आहेत. २ लाखांहून अधिक चाहत्यांनी विकीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला असून अनेकांनी कमेंट्सचाही वर्षाव केला आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरासह जगभरात रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून विकीच्या अभिनयाचे चाहते कौतुक करीत आहेत. १८० कोटींमध्ये बनलेल्या 'छावा' चित्रपटाने पाच दिवसांत तब्बल १७१. २८ कोटींची कमाई केलेली आहे. आजच्या कमाईतून चित्रपट सहज निर्मितीचा खर्च वसूल करणार आहे.