चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता रवींंद्र चव्हाण हे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत (फोटो - सोशल मीडिया)
अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार आहेत. सध्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आहे. मात्र आता विधासभा निवडणुकीमध्ये मैदानामध्ये उतरुन बावनकुळे यांनी सक्रीय राजकारणात पुन्हा एकदा प्रवेश केला, त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. या पदासाठी अनेक नावे पुढे आली आहेत. यामधून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
भाजपचे महाराष्ट्राचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र यासाठी भाजप पक्षांतर्गत जोरदार चर्चा आणि विचार विनिमय सुरु असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे मत लक्षात घेऊन दिल्लीचे पक्षश्रेष्ठी ठरवणार आहेत. साईनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीमधून भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा पदभार स्वीकारलेला होता. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूलमंत्री म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रवींद्र चव्हाण हे मंत्री होते. रवींद्र चव्हाण हे यापूर्वीच्या महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. यावेळी देखील ते डोबिंवली मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नावाच्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोण आहेत रवींद्र चव्हाण?
2007 सालापासून माजी मंत्री रवींद्र चव्हाण हे राजकारणामध्ये आले आहेत. अगदी नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. ते पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच पालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले. यानंतर 2009 मध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा ते डोंबिवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तसेच 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये चौथ्यांदा रवींद्र चव्हाण हे डोबिंवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा ओळखले जातात.
रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्रीपद देखील मिळाले होते. 2021 शिंदे सरकार आणण्यामध्ये आणि ते आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. शिंदे सरकारमध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. त्यांनी पालघर आणि सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.