'कोण काय म्हणत मला देणं-घेणं नाही'; छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय? (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज असल्याचे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता पुण्यातील एका संस्थेच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी भुजबळ म्हणाले की, 2014 मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत. आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
पुढे माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्याचा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच काँग्रेसमध्ये राहून काम केले असते आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला नसता, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर ओबीसींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यासाठी मी आजही पद नसताना लढत राहणार आहे,” अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ते पुढे म्हणाले, “तेलगी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, परंतु त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत व ते सिद्धही झाले नाही त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे, तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला आज मंत्रिपद का मिळाले नाही ? याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही, परंतु मानसन्मान जर मिळाला नाही तर माणूस दुःखी होतो,” अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावर भुजबळ म्हणाले की, “जरांगेंच्या आंदोलनामध्ये मी ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी भावना निर्माण झाली त्याचा निश्चितच फटका मला बसला आणि माझे मताधिक्य कमी झाले. परंतु तरीही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असे अनेकांना वाटते, परंतु छगन भुजबळ चा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी माझा वापर कोणालाही करू देत नाही,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल होणार का?
तुम्ही आता राज्यपाल होणार का? याविषयावर ते पुढे म्हणाले, “राज्यपाल हे अतिशय मानाचे पद आहे. त्या पदाचा मी मान राखतो परंतु माझा स्वभाव हा अन्यायाविरोधात बोलण्याचा आणि संघर्ष करण्याचा आहे राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही, मला राज्यपाल करणे म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच मी राज्यपाल पद स्वीकारू शकत नाही,” असे छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.