युगेंद्र पवारांच्या लग्नासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्षा बंगल्याला भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. (फोटो - सोशल मीडिया)
Supriya Sule In Varsha: मुंबई: देशामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण देशाचे लक्ष हे बिहारच्या निकालाकडे लागले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये झालेला प्रचार आणि राजकीय घटना यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सध्या समोर येत असलेल्या एक्झिट पोलनुसार, एनडीए ही बिहारमध्ये बाजी मारणार असल्याचे तरी सध्या चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बिहारच्या या निवडणुकीचे परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर गेल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता या भेटीमागील कारणही समोर आले आहे. ही भेट राजकीय स्वरुपाची नाही. तर सुप्रिया सुळे या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी वर्षा बंगल्यावर आल्याचे समजते आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर देखील भाष्य केले. खासदार सुळे म्हणाल्या की, “बिहारमध्ये नेमकं काय झालं आहे हे पाहिलं पाहिजे. निकालाचा पूर्ण उलघडा केला पाहिजे. आमचा प्रचार, म्हणणे आणि इतर अनेक गोष्टी बाबी तपासल्या पाहिजे. पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या मतांचं विभाजन का झालं याबाबत माहिती कळून येईल,” असे देखील मत खासदार सुळे यांनी ल्यक्त केले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
तातडीने ‘सुरक्षा ऑडीट’ होण्याची गरज
त्याचबरोबर पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला. या अपघाताबाबत देखील सुप्रिया सुळे यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “नवले पूल येथे काल झालेला अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत काही नागरिक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापुर्वीही येथे झालेल्या अपघातात जिवितहानी झाली आहे. हे रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज आहे. यासोबतच रस्ते सुरक्षेबाबत देखील सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने ‘सुरक्षा ऑडीट’ होण्याची गरज आहे. माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन जी गडकरी यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.






