प्रहार नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रायगडावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेली ही योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुती सरकारने या योजनेचे पैसे 1500 वरुन 2100 वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व महिला वर्गाची चिंता वाढली आहे. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आता लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज दाखल केलेल्या महिलांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारची ही लाडकी बहीण योजना ही अडीच लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी जाहीर केली आहे. तसेच ज्यांच्या नावे चारचाकी गाडी आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रहारचे नेते व अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माजी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती,सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले. सरकारने मतं घेतली मात्र आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणार, ही त्यांची फसवणूक आहे, त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला आता अपात्र ठरल्या जात आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाने पारदर्शक विचार करून चौकशी केली पाहिजे,” असे स्पष्ट मत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
पुढे बच्चू कडू म्हणाले की, “डायरेक्ट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेट मधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा प्रयत्न झाला आहे. ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हती, तर सत्तेत येण्यासाठी होती. सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणींची चाचपणी न करता त्यांना पैसे देऊन टाकले, तुम्ही (सरकारने) निकष न पाहता त्यांच्या खात्यात पैसे टाकले, मग आता म्हणता की त्या पात्र नाहीत. मग त्यांना पैसे द्यायच्या आधी पात्र ठरवायचं ना, पैसे दिल्यावर पात्र कसं ठरवायचं. हा क्राईम आहे, सरकारने गुन्हा केला आहे. सरकारने मतं घेतली, मात्र आता त्यांचे पैसे बंद करणार ही त्यांची फसवणूक आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली त्या लाडक्या बहिणींनी आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे,” असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
तपासणी होणार सुरु
मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची चाचपणी सुरु झाली आहे. पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचं नाव योजनेतून वगळलं जाणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.