अजित पवारानंतर बारामतीमधील पोटनिवडणुकीमध्ये कोण उभे राहणार याची चर्चा (फोटो - सोशल मीडिया)
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी बारामती मतदारसंघ हा सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मतदारसंघ होता. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर होणाारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे बारामतीकर काकांना साथ देणार की पुतण्याला साथ देणार याची सर्वांना उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष बाब म्हणजे बारामती विधानसभा निवडणुकीवेळी पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली होती. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.
हे देखील वाचा : महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणूक! निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये पोटनिवडणुकीच्या घोषणेची शक्यता
मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती ही दादांची असल्याचे सिद्ध झाले होते. बारामतीकरांनी अजित पवारांना मतदानरुपी दान देत त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठवले. मात्र अवघ्या दीड वर्षात अजित पवारांचे अपघाती दुर्दैवी निधन झाल्याने बारामतीमध्ये पोटनिवडणुकीची शक्यता आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे कोणताही नेता वारल्यानंतर त्याच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणूकीमध्ये विरोधी पक्षाकडून उमेदवार दिला जात नाही.
महाराष्ट्राची हीच राजकीय संस्कृती पुढे चालवली जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गट कोणताही उमेदवार देणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र जर उमेदवार देण्याचे निश्चित झाले तर पुन्हा एकदा युगेंद्र पवारांना संधी दिली जाणार का आणि बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का याची चर्चा सुरु झाली आहे.
हे देखील वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा
पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत,” असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.






