महाराष्ट्रामध्ये बारामती मतदारसंघ आणि राहुरी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे (फोटो - सोशल मीडिया)
महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बारामती विधानसभा आणि राहुल विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा
बारामती मतदारसंघ
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर अपघाती निधन झाले. यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवारांनंतर राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला होता. अजित पवारांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत चर्चांना पूर्णविराम लावला. याचबरोबर राज्यसभेमध्ये पार्थ पवार यांना संधी देण्यात आली आहे. आता बारामतीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार किंवा जय पवार यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.
राहुरी मतदारसंघ
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा जागेसाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. या जागेवर भाजपचे कर्डिले कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तनपुरे कुटुंब यांच्यात बऱ्याच काळापासून स्पर्धा आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात राहुरी, पाथर्डीचा मोठा भाग आणि अहिल्यानगरमधील काही गावे यासह तीन तालुके आहेत. पोटनिवडणुकीपूर्वी मतदारांची संख्याही वाढली आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये नेत्याच्या निधनानंतर बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून उमेदवार न दिली जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : गंहुजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानाला दिवंगत नेते अजित पवारांचे नाव ? आमदार सुनील शेळकेंची विधीमंडळात मागणी
बारामती आणि राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्यास बिनविरोध करण्याकडे लक्ष असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र, जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.






