विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अद्याप एकमत झालेले नाही. सुरुवातीच्या सूत्रानुसार, भाजपने १२ जागांवर दावा करत शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला आहे.
शिवसेना किमान ६ ते ७ जागांच्या मागणीवर ठाम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संबंधित मतदारसंघांत यापूर्वी पक्षाचे पाच आमदार होते, आता पक्षाची ताकद वाढल्याने सात जागांची मागणी करण्यात आली आहे. उमेदवारांबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणुकांमध्ये कमी जागांवर समाधान मानणारी शिवसेना यावेळी माघार घेण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसत आहे. काही कार्यकर्ते स्वतंत्र लढतीची मागणी करत असले तरी वरिष्ठ नेते अजूनही महायुती कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत.
जागांची अदलाबदल आणि नाशिकचा पेच
महायुती कायम राहिल्यास काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगड जागेवर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही दावा केला आहे. नाशिक आणि जळगाव जागांवरही तिढा कायम आहे.
महायुतीकडे 466 मते
नाशिक विधान परिषद मतदारसंघातील ६१९ मतदारांपैकी महायुतीकडे ४६६ मते आहेत. त्यात भाजपकडे सर्वाधिक १८८ मते असल्याने भाजप नाशिकची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे जळगावची जागा शिवसेनेला देऊन भाजप नाशिक आपल्याकडे ठेवू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
विधानपरिषदेची जोरदार तयारी सुरु
दुसरीकडे, राज्यातील विधान परिषद निवडणुका तोंडावर आल्या असून निवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेच्या १७ जागांच्या या निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अंतिम फॉर्म्युला ठरवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका आणि चर्चांदेखील वेगाने सुरू आहेत.






