उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका (रामदास आठवले)
कराड : अयोध्येत होणाऱ्या ‘रामरक्षा आंदोलनाच्या’ पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी ‘पक्ष रक्षा आंदोलन’ करण्याची अधिक गरज असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्याचबरोबर अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहारावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, या घटनेमुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याची खंत व्यक्त केली.
कराड येथे सुरू असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या आंदोलनस्थळी शुक्रवारी सायंकाळी भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले बोलत होते. उद्धव ठाकरे अयोध्येत रामरक्षा आंदोलनासाठी जात असल्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, आज उद्धव ठाकरेंसमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या पक्षातील आमदार आणि खासदार टिकवून ठेवण्याचे आहे. जेव्हा अयोध्येला जाण्याची योग्य वेळ होती, तेव्हा ते गेले नाहीत. आता ते रामरक्षा आंदोलनासाठी जात आहेत. मात्र, ते तिकडे असताना त्यांच्या पक्षातील उर्वरित आमदार-खासदारही दुसरीकडे जाऊ नयेत, याची काळजी त्यांनी घ्यावी.
राज्यात सुरू असलेल्या ‘टायगर ऑपरेशन’च्या चर्चेवर भाष्य करताना त्यांनी हे देवेंद्र फडणवीस यांचे ऑपरेशन नसून, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अंतर्गत परिस्थितीमुळे निर्माण झालेली अवस्था आहे, असे मत व्यक्त केले. ठाकरे यांनी आपल्या पक्षातील लोकांना एकत्र ठेवण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
विकासकामांसाठी आमच्याकडे येणाऱ्यांचे स्वागत
विरोधी पक्षातील लोकांना भाजप-एनडीएकडून फोडले जात असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना आठवले म्हणाले, आम्हाला कोणाचे आमदार किंवा खासदार फोडण्याची गरज नाही. राज्यात आणि केंद्रात आमच्याकडे बहुमत आहे. मात्र, विकासकामांसाठी आमच्याकडे येणाऱ्यांचे स्वागत आहे. आमच्याकडे येणाऱ्यांसाठी दरवाजे खुले आहेत; पण एकदा ते आल्यावर परतीचे दरवाजे बंद होतात. त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सर्वच जण आमच्याकडे आले, तर प्रत्येकाला सामावून घेणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राम मंदिर गैरव्यवहार हा प्रकार अत्यंत गंभीर
यावेळी अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत बोलताना आठवले यांनी, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. राम मंदिर ट्रस्टशी संबंधित शेकडो कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची दखल उत्तर प्रदेश सरकारने घेतली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरणामुळे देशाची अब्रू गेली
राम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधित अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, या प्रकरणामुळे देशाची अब्रू गेली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे सक्रिय असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही आठवले यांनी दिला.






