Maharashtra Breaking News Updates Today:
04 Jul 2026 10:20 AM (IST)
जर मेहनत करण्याची जिद्द असेल तर यशासाठी महागड्या कोचिंगची गरज नसते. चंद्रपूरचा रहिवासी असलेल्या अयान अब्बास अली अजानी याने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता, केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर सीए फाउंडेशन मे २०२६ च्या परीक्षेत संपूर्ण देशात दुसरा क्रमांक (AIR 2) पटकावला आहे. अयानचे हे यश अशा लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे जे मर्यादित संसाधने असूनही मोठी स्वप्ने पाहतात.
04 Jul 2026 10:10 AM (IST)
वाहन निर्माता महिंद्रा एक कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्वरुपात Mahindra XUV 3XO ऑफर करते. ही एसयूव्ही बाजारात विविध व्हेरिअंट्समध्ये ऑफर केली जाते. जर तुम्ही या एसयूव्हीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. एक लाख रुपये डाउनपेमेंट केल्यानंतर गाडी घरी घेऊन येण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल, याचे गणित समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.
04 Jul 2026 10:00 AM (IST)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अत्यंत संवेदनशील आणि दरडप्रवण मानल्या जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्ग (SH-१३९) वरील ‘आंबेनळी घाट‘ ३ जुलै २०२६ ते ६ जुलै २०२६ (एकूण ४ दिवस) सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी जाहीर केला आहे.
04 Jul 2026 09:35 AM (IST)
Modi Cabinet Reshift: संसदच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वीच केंद्र सरकारकडून बहुप्रतिक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची (Modi Cabinet Reshuffle) अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य फेरबदलात काही प्रस्थापित चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याचा मोठा धक्का बसणार असला, तरी अनेक नव्या चेहऱ्यांना थेट मोदी कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याचे संकेत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठी पदोन्नती (Promotion) मिळण्याचे संकेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीन गडकरी यांच्या खांद्यावर अत्यंत महत्त्वाची आणि नवी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील काही इतर दिग्गज नेत्यांनाही थेट केंद्रात मानाचे स्थान मिळण्याची चिन्हे असून, आगामी काही दिवसांतच या संदर्भातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.
04 Jul 2026 09:30 AM (IST)
Vaibhav Suryavanshi News: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्याची मागणी जोर धरत असतानाच, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी यावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. संघात स्थान देण्याच्या वाढत्या मागणीवर बोलताना गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी स्पष्ट केले की, वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी सध्या तरी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. भारताच्या मजबूत फलंदाजीच्या फळीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे.
04 Jul 2026 09:25 AM (IST)
Mumbai Municipal Corporation : चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एका १० वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या नागरिकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन गंभीर दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कारभारावर प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनांचे राजकीय पडसाद आता तीव्रतेने उमटू लागले असून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्या कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपमहापौर संजय घाडी यांनी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच या निष्काळजीपणासाठी जबाबदार धरले असून, त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे
04 Jul 2026 09:20 AM (IST)
Raja Raghuvanshi Case: मेघालयातील बहुचर्चित राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिच्या जामिनाला तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मेघालय सरकार आणि पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने सोनमला नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, अटकेदरम्यान झालेल्या पोलिसांच्या गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी, खटल्याची संथ गती आणि जामिनाबाबतच्या कायदेशीर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सविस्तर चर्चा झाली.
04 Jul 2026 09:15 AM (IST)
Kolhapur Rains : कोल्हापूर जिल्हा आणि धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीची पातळी अवघ्या २४ तासांत झपाट्याने वाढून आता २२ फुटांवर पोहोचली आहे. या सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सध्या पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. धरण क्षेत्रातील सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.
04 Jul 2026 09:10 AM (IST)
Eknath Shinde Hospitalized : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या वृत्ताने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्यांच्या प्रकृतीबाबतचे पुढील तपशील लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार (रिपरिप) सुरू असतानाच, जिल्ह्यातील घाट परिसरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, घाट परिसरातील ताम्हिणी येथे १७० मिमी आणि लोणावळा येथे १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवाजीनगर येथे ११ मिमी, दापोडी येथे ११.५ मिमी, पाषाण येथे १३.२ मिमी आणि चिंचवड येथे ८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
८ जुलैपासून पावसाचा जोर कमी होणार भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेला हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असला, तरी ८ ते १४ जुलै या कालावधीत राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पड






