मंत्री नितेश राणे यांनी शनिवारवाडा नमाज पठन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Shaniwar wada namaz pathan: रत्नागिरी : ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला. शनिवारवाड्यामध्ये काही मुस्लीम महिलांनी सामुहिक नमाज पठन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली. मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये जात त्या ठिकाणी गोमुत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलिसांना त्यांना मज्जाव केल्यानंतर तिथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
या प्रकरणावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शनिवारवाडा प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. नितेश राणे म्हणाले की, “नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का? उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का? शनिवार वाडा हे आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असलेले धार्मिक स्थळ आहे. तिथे जर तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालीसाचे पठण सुरू केले तर मग काय करायचे,” असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “जो न्याय तुम्ही हाजी अलीला लावता तोच अन्य धार्मिक स्थळांना देखील लावा. वातावरण कोण खराब करत आहेत? कशाला तिथे नमाज पडायचे आहे. नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहे का? वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. मग हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात चूक काय? जो आवाज आमच्या कार्यकत्यांनी उचलला तो बरोबर आहे,” असे देखील मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी आणि मनसे पक्ष मतदान यादीमधील घोटाळ्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत नितेश राणे म्हणाले की, “नितेश राणे पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने लोकसभेत एका-एका मतदारसंघात लाख-दीड लाख मतदान झाले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जिंकून आले. तेव्हा व्होट चोरीचे, व्होट जिहादचे कोणीच आरोप केले नाहीत. जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले. पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं. तेव्हा त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधाळला गेला त्याचं उत्तर महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने हिंदुत्व विचारांचे सरकार येण्यासाठी भगव्या गुलालाने दिले. तेव्हाच आता व्होट चोरीचे आरोप व्हायला लागले. राज ठाकरे आजकाल ज्यांचा मांडीला मांडी लावून बसतात, त्या संगतीचा हा परिणाम असू शकतो. कारण उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्राला माहित झालेले आहे,” अशी टीका भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.