शिवाजी पार्कसाठी राजकीय 'महायुद्ध'! (Photo Credit- X)
निवडणुकांसाठी उरला फक्त एक महिना
निवडणुकीसाठी केवळ एक महिना उरला असून या कालावधीत जागा वाटप, नामनिर्देशन अर्ज भरणे, घरोघरी प्रचार यानंतर जाहीर सभा होणार आहेत, त्याकरीता राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चबाधणी सुरू केली आहे. त्यातही दादरचे शिवाजी पार्क हे मैदान मोठे असून मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी आहे.
प्रचारासाठी धडपड
मराठी माणसाचा बालेकिल्ला असलेल्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर प्रचार सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्येही चुरस असते. त्यामुळे मतदानाच्या दोन तीन दिवस आधी प्रचार सभेसाठी परवानगी मिळावी याकरीता शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे) आणि मनसे या तीन पक्षांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत.
राजकीय पक्षांमध्ये चुरस
शिवाजी पार्क मैदान आणि राजकीय सभा यांचे जुने नाते आहे. त्यातही शिवसेनेचे या मैदानाशी अधिकच जवळचे नाते आहे. मात्र शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर सभा घेता यावी यासाठी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये आणि अन्य राजकीय पक्षांमध्ये प्रत्येक निवडणूकीच्यावेळी चुरस असते. प्रचारासाठी ११,१२ व १३ जानेवारीच्या तारखांना अधिक मागणी आहे. जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आलेल्या अर्जावर पालिका देणार निर्णय
शिवसेना (शिंदे) पक्षाने ११,१२,१३ जानेवारी यापैकी एका दिवसासाठी परवानगी अर्ज दिला आहे. तर १२ जानेवारीसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने अर्ज दिला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ११ जानेवारीला प्रचारसभेसाठी अर्ज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व अर्जावर मुंबई महापालिका प्रशासन निर्णय घेऊन परवानगी देणार आहे मात्र, तोपर्यंत परवानगी मिळावी याकरीता मोठे राजकारण रंगणार यात शंका नाही. तसेच मनसे आणि शिवसेना (ठाकरे) बंधूंची एकत्र जाहीर सभा होणार का याबाबतही उत्सुकता आहे.






