राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा तथ्यहीन - भुजबळ (File Photo)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येतील, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे. ‘काही लोकांच्या इच्छा असू शकतात. इच्छा नाहीत असं नाही. पण, तसा कोणताही प्रस्ताव नाही’, असे म्हणत विलीनीकरणाच्या चर्चा तथ्यहीन असल्याचे त्यांनी सूचित केले.
शरद पवार यांनी विलीनीकरणाचा निर्णय नवी पिढी घेईल, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नेते छगन भुजबळ यांनी सूचक भाष्य करत ‘काही लोकांच्या इच्छा असू शकतात. इच्छा नाहीत असं नाही. पण, तसा कोणताही प्रस्ताव नाही’. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी हे विधान केले. ‘मला तरी वाटतं अशी काही चर्चा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील स्पष्ट सांगितलं की, अशा काही चर्चा नाहीत. त्यापुढे ते काही बोललेले नाहीत. त्यामुळे त्यामध्ये फार काही तथ्य आहे असं वाटत नाही’.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काही लोकांच्या इच्छा असू शकतात. इच्छा नाहीत असं नाही. मात्र, तशी काही चर्चा नाही किंवा तसा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांनी या संदर्भातील सर्व चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
महायुती एकत्रच, पण…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करताना भुजबळ म्हणाले, ‘याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत. पण, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवल्या जाऊ शकतात’, असेही भुजबळ म्हणाले.
विधानसभेप्रमाणे पेचाचे प्रसंग येतील
तसेच ते पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती होईल किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काही ठिकाणी स्वतंत्र लढले जाईल, अशा प्रकारच्या दोन्ही शक्यता वर्तवलेल्या आहेत. आम्ही एकत्र आहोत हे त्यांनी सांगितलेलं आहे. विधानसभेला अनेक ठिकाणी महायुतीच्या दोन कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील असे काही ठिकाणी होऊ शकते’, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.