देवेंद्र फडणवीसांचे निर्देश पायदळी; तासगावात संदीप गिड्डेंचा स्फोटक आरोप
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुती करावी, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, हे निर्देश धाब्यावर बसवत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पॅनेल टाकल्याचा गंभीर आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्ढे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योती पाटील यांना ‘मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील’ असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
गिड्ढे म्हणाले, “मी भाजपचा समर्पित कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. तासगावात राष्ट्रवादीसोबतच युती करावी, ज्योती पाटील बलवान उमेदवार आहेत, याची माहिती मी वरिष्ठ नेतृत्त्वाला दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही ज्योती पाटील यांच्या उमेदवारीला होकार दिला होता. तरीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना अंधारात ठेवत स्वतंत्र पॅनेल लावले.”
हेदेखील वाचा : NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार
ते पुढे म्हणाले, “मला नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतून दूर ठेवले गेले. शहर-ग्रामीण संघटनांमध्ये समन्वय नाही. वरिष्ठांकडून आलेल्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत.”
कुरुक्षेत्रातील अर्जुनासारखी अवस्था
तासगाव निवडणुकीत माझी अवस्था कुरुक्षेत्रातील अर्जुनासारखी झाली आहे, अशी बोचरी टिप्पणी करत गिड्ढे म्हणाले, “माझ्या शिलेदारांना विविध पक्षातून उभे केले आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार. ज्योती पाटील यांच्या प्रचारात मी सक्रिय राहणार.”
स्वप्नील पाटील म्हणजे ‘अभिजीत बिचुकले’; नाव न घेता टीका
भाजपच्या स्वतंत्र पॅनेलबाबत विचारले असता गिड्ढे म्हणाले, “पॅनेल कोणीही लावू शकतो. साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले पॅनेल लावतात. त्यात काही नवीन नाही.” यामधून त्यांनी स्वप्नील पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
माझ्यावर कुरघोड्या तर उत्तरही कठोर
“कोणी माझ्या राजकीय अस्तित्वाला धक्का देण्याचा प्रयत्न केला तर मी स्वस्थ बसणार नाही. आजवर उपयुक्त मूल्य दाखवले; पण आता उपद्रव मूल्य दाखवण्याची वेळ आली आहे.” असे ते म्हणाले. तासगावातील भाजप अंतर्गत संघर्ष उफाळून येत असताना गिड्ढे यांच्या आरोपांमुळे नगरपालिका निवडणुकीत नवे समीकरण आकाराला येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : राज्यात महायुतीला मोठा धक्का; कोकणातील ‘या’ भागात दिसून आले नवे समीकरण






