कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून ठाकरे गट बाहेर पडल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला तर महायुतीचा एकतर्फी विजय झाला. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाचे खापर मित्रपक्षांवर फोडण्यात येत आहे. तसेच अंतर्गत नाराजी व वादंग सुरु आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला आहे. खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यावर आता कॉंग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात असणारी महाविकास आघाडी आणि केंद्रात असणारी इंडिया आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडीमधील नेते नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे देखील सांगितले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. यामुळे राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीमधून ठाकरे गट बाहेर पडल्यानंतर यावर आता कॉंग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बिघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर असे निर्णय होत असतात. पॉलिसी डिसीजन म्हणून एकत्र ठरवता येऊ शकतं. पण व्यक्तीगत निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची स्थानिक पातळीवर तयारी केलेली असते. अधिकृत घोषणा केली, त्यांनी ठरवलं तर त्यांचा पक्ष आहे. ते निवडणूक लढवू शकतात. सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची तयारी आहे. महाविकास आघाडीने एकत्र बसून विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं” असे मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा
काय म्हणाले होते संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मुंबईपासून नागपूर महापालिका आम्ही स्वबळावरुन लढणार, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. याबाबत आम्हाला उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे म्हणून स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये अनेक बदल होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महाविकास आघाडी फुटल्यानंतर नवीन राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.