कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला आहे (फोटो - सोशल मी़डिया)
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या आंदोलन करत आहेत. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले असून आज (दि.13) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. बच्चू कडू यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी देखील फोन केला होता. यानंतर बच्चू कडू यांना कॉंग्रेस पक्षाचा देखील पाठिंबा मिळाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांना विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्य प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांंनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांची भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, अशा परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन करून या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. काँग्रेस पक्षही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहे. शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी तसेच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागण्यासांठी राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून आंदोलने सुरु आहेत. जगाचा पोशिंदा बळीराजाच अडचणीत आहे. शेतकरी जगला तर महाराष्ट्र आणि देश जगेल, त्यामुळे शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारविरोधातील संघर्ष चालूच ठेवणार असून आगामी काळात तो आणखी तीव्र करेल.
शेतक-यांच्या प्रश्नासाठी सुरु असलेल्या बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे,…
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 13, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे गोरगरीबांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत आहोत. बच्चू भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू, सरकारला सळो की पळो करुन सोडू. बच्चू कडू यांच्या मागण्याची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जात-पात न पाहता रस्त्यावर उतरायला हवं. कारण जीवाची बाजी लावणं सोपं नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.