राज उद्धव या ठाकरे बंधूंच्या युतीला कॉंग्रेस पाठिंबा देणार की विरोध करणार? (फोटो - टीम नवराष्ट्र)
Thackeray Brothers alliance : मुंबई : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई पालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजप, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये आवाज कायम ठेवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे हे युतीमध्ये येण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीमध्ये अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेला कॉंग्रेस पक्ष मनसेसोबत युतीकरण्यास सहमती देणार का यावरुन चर्चा रंगली आहे
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेकदा भेटी घेतल्या आहेत. मराठी भाषेवरुन दोन्ही बंधू मागील वाद विसरुन एकत्र आले आहेत. यानंतर अनेक सणांना दोन्ही नेते एकमेकांच्या घरी देखील गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरुन ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही नेत्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी देखील सूचक संकेत दिले आहेत. मात्र राज ठाकरे यांची युती फक्त ठाकरे गटासोबत मर्यादित न ठेवता महाविकास आघाडीसोबत घेण्याची चर्चा सुरु आहे. मात्र यावर कॉंग्रेस पक्षाकडून काय भूमिका घेतली जाणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “स्वत : राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणं गरजेच आहे, ही त्यांची भूमिका आहे. प्रत्येकाचं या राज्यात एक स्थान आहे, शिवसेना ( ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) या पक्षांचं, डाव्या पक्षांचं स्थान आहे. तसंच काँग्रेस हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना शिष्ट मंडळात काँग्रेसचा समावेश होण गरजेचे आहे ही आमची भूमिका आहे. तीच राज ठाकरे यांची देखील आहे ” असं संजय राऊत म्हणाले. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे.
याच मुद्द्यावर कॉंग्रेस पक्षाने देखील प्रतिक्रिया दिली आहे, मनसेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर कॉंग्रेस नाराज आहे की आनंदाने सहमत आहे याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेला सोबत घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. पण सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.