निवडणूक स्वतंत्र की युतीमधून लढायचे?उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार घोषणा (संग्रहित फोटो)
पुणे : लोकसभा, विधानसभा त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत. या निवडणुका येत्या चार महिन्यांत लागतील. त्यामुळे प्रत्येक पक्षाने काम सुरू केले आहे. या निवडणुकीची तयारी ज्याने-त्याने आपापल्यापरीने सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्यावेळी मी या निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महायुती म्हणून याबाबत भूमिका मांडेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. परंतु, अंतिम निर्णय नंतर घेणार आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार याबाबत विचारले असता, ते त्यांचे ठरवतील. पण त्या पक्षाचे हितचिंतक असतात, त्यांना जे-जे वाटते ते बोलतात. दरम्यान, सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत चर्चा आहे, यावर बोलताना पवार यांनी याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण त्याला उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे, असे सांगून त्यावर अधिकचे भाष्य टाळले.
पक्षाचे कार्यकर्तेही काम करायला लागलेत
मंगळवारच्या वर्धापनदिनी सकाळच्या उद्घाटन सत्रापासून इतर नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आपआपली मते मांडतील, विविध विषयावर चर्चा करतील. आम्ही आमचे काम करत आहोत व पक्षाचे कार्यकर्तेही आपापल्यापरीने काम करायला लागले आहेत. सायंकाळी समारोप कार्यक्रमात मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत भूमिका मांडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर पुढे जाईल, असे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. आगामी काळातील या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांना सर्वाधिकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत महाविकास आघाडी तुटलेली असेल, असे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.