ओमर अब्दुल्ला यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यावेळी कॉंग्रेस सामील होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. (फोटो -सोशल मीडिया)
जम्मू : मागील आठवड्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणूका पार पडल्या. यामध्ये हरयाणामध्ये भाजपला बहुमत मिळाले तर जम्मू काश्मीरमध्ये मोठा फटका बसला. जम्मू – काश्मीरमध्ये प्रादेशिक पक्षांना मतदारांनी समर्थन दिले. नॅशनल कॉन्फरन्स पार्टी या पक्षाला जम्मू काश्मीरमध्ये चांगले यश मिळाले. नॅशनल कॉन्फरन्स पार्टीला 42 तर कॉंग्रेस पक्षाला 6 जागा मिळाल्या आहेत. निकालानंतर लगेचेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत युतीमध्ये सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र आता जम्मू काश्मीरमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये आज सरकार स्थापन केले जाणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी 10 नेते हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हे सरकार युतीमध्ये तयार होत असले तरी एकही कॉंग्रेस नेता आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेणार नसल्याचे समोर आले आहे. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्रिपदाची ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्यासह सकीना इटू, मीर सैफुल्ला, अब्दुल रहीम राथर, अली मोहम्मद सागर / सलमान सागर, जावेद राणा, सुरिंदर चौधरी, सज्जाद शाहीन आणि सतीश शर्मा हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
काँग्रेसमध्ये जम्मू काश्मीर सरकारमध्ये युतीमध्ये सामील होण्याचे की नाही यावरुन विचारविनिमय अद्याप सुरु आहे. सरकारमध्ये पूर्णपणे सामील व्हायचे की नाही की बाहेरुन पाठिंबा द्यायचा हे कॉंग्रेस पक्षाचे ठरलेले नाही. याबाबत अधिकची माहिती देताना काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रभारी भरत सिंह सोलंकी म्हणाले, “मंत्रिपद वाटपाबद्दल नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत ‘नॅशनल कॉन्फरन्स’सोबत चर्चा सुरू आहे. काँग्रेस युतीत आहे. मात्र, आज कोणीही काँग्रेसचा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही. कारण, सरकारमध्ये सामील व्हायचं की बाहेर समर्थन द्यायचं? याबद्दल चर्चा सुरू आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या ओमर अब्दुल्ला यांच्या पार्टीमध्ये कॉंग्रेस सामील होणार की नाही याबाबत साशंकता आहे.