राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद
पुणे : प्रभाग २५ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पदयात्रा काढली. आमदार हेमंत रासने यांच्या उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी यावेळी उमेदवारांचे स्वागत केले व राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला.
प्रभाग २५ चे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर, स्वरदा गौरव बापट आणि कुणाल शैलेश टिळक, स्वप्नाली नितीन पंडित यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा काढण्यात आली होती. पंताचा गोट येथून सायंकाळी ५ वाजता या पदयात्रेला सुरुवात झाली. ‘प्रभाग २५ मधील पुणेकरांचा निर्धार, निवडून येणार भाजपचेच उमेदवार’, ‘पुण्याची शान, भाजपचा मान; प्रभाग २५ चा वाढवू सन्मान’ अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पदयात्रा कुमठेकर रस्ता, चित्रशाळा चौक आणि फडतरे चौकात पोहोचली तेव्हा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
पेरुगेट, पावन मारुती आणि लिमयेवाडी परिसरात स्थानिक रहिवाशांनी घराच्या बाल्कनीतून उमेदवारांवर पुष्पवृष्टी केली. उमेदवारांचे ठिकठिकाणी पुणेकर औक्षण करून स्वागत करत होते, बाल्कनीतून पुष्पवृष्टि केली जात होती. नवजवान चौक, नागनाथपार, गायआळी आणि निंबाळकर तालीम परिसरात मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
खजिना विहीर, स्वामी समर्थ मंदिर आणि माडीवाले कॉलनीमार्गे बाजीराव रस्त्यावरील भिकारदास मारुती मंदिर येथे दर्शन घेत विजयाचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला. यावेळी भाजपच्या चारही उमेदवारांनी तत्पर लोकसेवेतून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. यावेळी अनेक गणेश मंडळांकडून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखा पाषाणकर, उज्वला पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






