निवडणूक घोषणेपूर्वीच 'शिवसेना' सरसावली; अलिबाग तालुक्यात उमेदवारी जाहीर करून आघाडी (फोटो सौजन्य-X)
भारत रांजणकर, अलिबाग: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती होणार नाही असे स्पष्ट संकेत शिवसेना नेत्यांनी दिले आहेत. याचदरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेने (Shiv Sena) अलिबाग तालुक्यात निवडणुकीच्या तयारीमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही घोषणा शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाई केणी यांनी केली आहे.
शिवसेनेने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी आपल्या संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जि. प. उमेदवार: रसिका राजभाई केणी (आंबेपूर जिल्हा परिषद गट ३७)
पं. स. उमेदवार (आंबेपूर): शैलेश दादा पाटील (आंबेपूर पंचायत समिती गण ६१)
पं. स. उमेदवार (भोमोली): कृष्णा दादा लोहमी (भोमोली (कुर्डूस) पंचायत समिती गण ६२)
निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसतानाच शिवसेनेने उमेदवारांची घोषणा करून एकप्रकारे राजकीय वातावरण तापवले आहे. या निर्णयामुळे अलिबाग तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच उमेदवारांची घोषणा करण्याची शिवसेनेची ही रणनीती खूप महत्त्वाची आहे. यामुळे…
प्रचाराला लवकर सुरुवात: उमेदवारांना त्यांच्या गटात व गणात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रचारासाठी अधिक कालावधी मिळेल.
मतदारांशी संवाद साधणे: संभाव्य मतदारांना उमेदवारांचे नाव आणि चेहरा लवकर माहिती होईल, ज्यामुळे प्रचाराची धार वाढेल.
विरोधकांवर दबाव: अचानक उमेदवारी जाहीर झाल्याने, प्रतिस्पर्धी पक्ष आणि गटांना त्यांच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी व त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी घाई करावी लागेल.
शिवसेनेने घेतलेल्या या ‘अर्ली बर्ड’ निर्णयामुळे अलिबाग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापलेला दिसत आहे. विरोधक यावर काय आणि कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.