पश्चिम बंगालपासून ते पुद्दुचेरीपर्यंत कोणाचे आहे विद्यमान सरकार? संख्याबळ नेमकं किती? जाणून घ्या आकड्याचं गणित...
पुणे / कृपादान आवळे : आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेसाठी मतदान घेतले गेले होते. आता या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. हे निकाल देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार बनले, तर विरोधक पुन्हा एकदा ‘भाजपमुक्त’ महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करू शकतात.
पश्चिम बंगालमध्ये 294 जागा
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या विद्यमान मुख्यमंत्री असून, तृणमूल काँग्रेस हा त्यांचा पक्ष सध्या सत्तेत आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ जागांसाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४२ जागांसाठी मतदान झाले. एका जागेवर फेरमतदान होणार असल्याने, आज २९३ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. प्राथमिक कलांनुसार भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात अटीतटीची लढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी 148 ही ‘मॅजिक फिगर’ची गरज लागणार आहे.
आसाममध्ये 126 जागांवर मतदान
आसाममध्ये एकूण १२६ विधानसभा जागा आहेत. राज्यातील सर्व १२६ विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले. सध्या भाजपचे सरकार असून, हिमंता बिस्वा सरमा हे मुख्यमंत्री आहेत. बिस्वा यांच्या नेतृत्वाखालील भाजपला विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा विश्वास आहे. दरम्यान, राज्यात सत्तेपासून १० वर्षांचा वनवास संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसलाही विजयाची आशा आहे. यावेळी राज्यात ८५ टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदानाची नोंद झाली. त्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी 64 ही ‘मॅजिक फिगर’ची गरज लागणार आहे.
तामिळनाडूत 234 जागा
तामिळनाडूमध्ये २३४ विधानसभा जागा आहेत. या जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले. राज्यभरातील मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि मतदानाची टक्केवारी ८५.१४ टक्क्यांवर पोहोचून मागील सर्व विक्रम मोडले. राज्यात मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमकेचे सरकार आहे. विरोधी एनडीएचे नेतृत्व एआयएडीएमके करत आहे. थलपथी विजय यांच्या नेतृत्वाखालील नव्याने स्थापन झालेला टीव्हीके पक्ष ही लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी 118 ही ‘मॅजिक फिगर’ची गरज लागणार आहे.
केरळमध्ये 140 जागांसाठी झाले मतदान
केरळ या किनारपट्टीच्या राज्यातील १४० विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात ७८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफचे सरकार आहे. त्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी 71 ही ‘मॅजिक फिगर’ची गरज लागणार आहे.
पुद्दुचेरीत एनडीएचे सरकार
पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेशातील ३० जागांसाठीही ९ एप्रिल रोजी मतदान झाले. या केंद्रशासित प्रदेशात ८९.९७ टक्के मतदानाची नोंद झाली. पुदुचेरीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे सरकार असून, रंगस्वामी हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी 16 ही ‘मॅजिक फिगर’ची गरज लागणार आहे.






