पवारांचे विश्वासू सहकारी विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन
अहिल्यानगर : अहिल्यानगर सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे, नगरसह राज्यभर “काका” म्हणून सर्वांना परिचित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार अरुण बलभीम जगताप यांची आज (दि.२) पहाटे प्राणज्योत मावळली. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांचे ते वडील होत. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतांमुळे पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अनेक महत्वाच्या पदांवर बजावली उल्लेखनीय भूमिका
माजी आमदार अरूण काका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले तर अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँकेवर देखील त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य होते, तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तर सलग दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार म्हणून अरुण काकांनी काम केले आहे. याच बरोबर सामाजिक, राजकीय, क्रीडा, कला क्षेत्रातही त्यांनी अनेकांचे जीवन सार्थकी लावले आहे. त्यांचे खेळासोबतच कुस्तीवर देखील विशेष प्रेम नगरकरांनी अनुभवले आहे. त्याच बरोबर अरुण जगताप हे पवार कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित होते.
५ एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण काकांचा अहिल्यानगर सह छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक यांसह महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. याच दरम्यान त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सर्वच धर्मियांकडून प्रार्थना देखील सुरु होत्या. परंतु आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पंढरपूरच्या विठ्ठलावर अनन्यसाधारण भक्ती
जगताप कुटुंबीयांची पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई वर अनन्यसाधारण भक्ती होती. पूर्वीपासूनच जगताप कुटुंबीय वारी काळामध्ये नगर ते पंढरपूर वारी करीत असे. हाच वारसा आता आ. संग्राम जगताप व सचिन जगताप यांनी समर्थपणे सांभाळली असून, वारी काळात वारकऱ्यांच्या सेवेपासून त्यांच्या अडीअडचणीच्या काळामध्ये नेहमीच जगताप कुटुंबीय धावून गेले आहे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी जगताप कुटुंब पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असे.
माजी आमदार अरुण काका जगताप यांचे अंतिम पार्थिव दर्शन आज दुपारी २ वाजता भवानीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरापासून भवानीनगर, महात्मा फुले चौक, जिल्हा सहकारी बँक, स्वस्तिक चौक, टिळक रस्ता, आयुर्वेद कॉलेज, बाबावाडी मार्गे अंत्यविधीसाठी अमरधाम येथे नेण्यात येईल.