'आम्ही पैशांची मागणी केली नाही, शारीरिक संबंध होणार नाहीत तर...'; गिरीजा राऊतांच्या आईचा विनायक राऊतांवर गंभीर आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सून गिरीजा राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळल्यानंतर आता गिरीजा राऊत यांच्या आई पूजा पवार यांनीही माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी विनायक राऊत यांच्या दाव्यांना प्रत्युत्तर देत पैशांच्या मागणीचे आरोप नाकारले आणि आपल्या मुलीला मानसिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप केला.
पूजा पवार म्हणाल्या की, “आम्ही गेली तीन वर्षे चर्चेसाठी आणि गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो. आमचा उद्देश वाद वाढवण्याचा नव्हता, तर प्रश्न सामोपचाराने सोडवण्याचा होता.”
विनायक राऊत यांनी 5 लाख रुपये मासिक खर्च, 10 कोटी रुपये, घर आणि कारची मागणी करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, पूजा पवार यांनी हा दावा फेटाळून लावला. त्या म्हणाल्या, “आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही तीन वर्षे थांबलो नसतो. आम्हाला फक्त आमच्या मुलीचा संसार टिकावा, अशी इच्छा होती.”
पूजा पवार यांनी गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार करत, “शारीरिक संबंध होणार नाहीत, तर मुलं होणार कशी?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, आपल्या मुलीला मानसिक त्रास देण्यात येत होता आणि फोनवर बोलतानाही स्पीकरवर बोलण्यास भाग पाडले जात होते, असा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, विनायक राऊत यांच्या अटकेचीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे केले असून या आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
सुनेच्या आरोपांवर उत्तर देताना विनायक राऊत यांनी दावा केला की, गितेश राऊत यांनी अलीकडेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये तडजोडीबाबत चर्चा झाली. यावेळी 5 कोटी रुपये, 3BHK टेरेस फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाची नोटीस देण्यात आली आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.






