सूनेच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, '5 कोटी, 3BHK फ्लॅट, इलेक्ट्रिक कारची मागणी'; सूनेच्या आरोपांवर पलटवार
ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर अखेर विनायक राऊत यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्यावरील आणि कुटुंबीयांवरील सर्व आरोप “निखालस खोटे” असल्याचा दावा करत तक्रारीमागे वेगळा हेतू असल्याचे म्हटले.
गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी विनायक राऊत यांनी सुनेने केलेल्या आरोपांचे खंडण केले. ते म्हणाले की, गितेश राऊत यांचे लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी मागील तीन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हती. तसेच, 2018 ते 2022 या कालावधीत कथित अघोरी प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, त्या काळात गिरीजा राऊत आपल्या आई-वडिलांसोबत असल्याचा उल्लेख तिनेच केला आहे. जर असे प्रकार घडत होते, तर त्याच वेळी तक्रार का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विनायक राऊत यांनी दावा केला की, गितेश राऊत यांनी अलीकडेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये तडजोडीबाबत चर्चा झाली. यावेळी 5 कोटी रुपये, 3BHK टेरेस फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाची नोटीस देण्यात आली आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.






