ईश्वरपूरच्या राजकारणात भूकंप..! नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सत्ताधारी राष्ट्रवादीत खळबळ
ईश्वरपूर : अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याच्या कारणावरून उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेचे थेट नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अपात्र ठरवले आहे.
नगराध्यक्ष मलगुंडे यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ४४(१)(ई) अंतर्गत अपात्र ठरविण्याचा आदेश झाल्याने शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी १० जुलैला जिल्हाधिकारी सांगली यांच्या सहीने आदेश पारित झाल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने महायुतीला जोरदार धोबीपछाड दिली होती. ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सत्तांतर केले. नगराध्यक्षपदी आनंदराव मलगुंडे विराजमान झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा ७ हजार ३२९ मतांनी पराभव केला होता.
जयंत पाटील यांनी राजकीय ताकद दाखवत महायुतीला मोठा धक्का दिला होता.एकूण ३० नगरसेवकांपैकी तब्बल २२ नगरसेवक विजयी झाले होते. महायुतीचे केवळ ८ उमेदवार निवडून आले होते. पण आता नगराध्यक्ष अपात्रतेचा आदेश निघाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उट्टे काढले होते. आतां नगराध्यक्ष अपात्र ठरल्याने आतां पुढे काय ? याची शहर भर चर्चा रंगली आहे.
जयकर दिनकर जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नगराध्यक्ष मलगुंडे यांनी त्यांच्या मालकीच्या भूखंडावर पेठ–सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, महसूल व नगरपालिकेच्या नोंदी तसेच उपलब्ध कागदपत्रांचा सखोल विचार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे नमूद करत अपात्रतेचा आदेश दिला.
आदेशानुसार मलगुंडे यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदीनुसार पदासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र, या आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे आदेश प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत अपील दाखल करण्याची तरतूदही आदेशात नमूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेतील सत्तासमीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
२०२९ ची रणनीती आतापासूनच; वाई-पाटणमध्ये भाजप संघटन विस्ताराच्या मोहिमेला वेग
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. आगामी काळात अपील, नगराध्यक्षपदाचा प्रश्न आणि सत्ताधारी गटाची पुढील रणनीती याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी भू-मापन क्र. ८/१अ, ८/२अ/२, ८/२अ/३, ८/१ब, ८/२ व ११ या मिळकतींमध्ये पेठ–सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश देण्यात आला आहे. आदेशाविरुद्ध १५ दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची तरतूदही आदेशात नमूद आहे.






