नाशिक विधानपरिषदेच्या तिढा संपला ! अखेर गोकुळ गीतेंनी घेतला मोठा निर्णय
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी बातमी समोर येत असून नाशिक विधान परिषदेच्या जागेबाबतचा तिढा आता संपला असल्याचे समजते. नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती. या विधान परिषदेसाठी शिंदे गटाच्या नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यामुळे भाजपमधील गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता मात्र गोकुळ गीते यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर गोकुळ गीतेच्या मनधरणीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता मात्र हा तिढा सुटला असून गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज (गुरुवार, ११ जून) गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या निवासस्थानी महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे उपस्थित होते.
नाशिक जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी गणेश गीते यांनी भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र या जागेवर महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र फरांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र गोकुळ गीते यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु आता, मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांनी यातून मार्ग काढण्यात यश मिळवले आहे. गोकुळ गीते यांनी या निवडणुकीत नरेंद्र दराडेंना पाठिंबा दिला असून त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. अखेर गीते यांचं बंड थोपवण्यात महायुतीला यश आलं असून नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीसाठी मोठी चिंता दूर झाल्याचे समजत आहे.






