'गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही'; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ‘तुमच्या वयाएवढी राजकीय कारकीर्द झालेल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांनी जाहीर माफी मागावी. नाही तर घरातून बाहेर पडू देणार नाही’ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. वेळ पडली तर जिथे असाल तिथे येऊन बांगड्या भरू. असा सज्जड दम महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी असा वाचाळवीर आमदारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी झाली.
कचेरी चौकात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गावागावातून कार्यकर्ते एकत्रित झाले आहे. यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला अध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्यासह विविध संस्थाचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेदेखील वाचा : “मुद्दामहून वाचाळवीर निर्माण …सत्ताधाऱ्यांनी महाभागांना पोसलं; पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचा राग उफाळला
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, ‘आमदार पडळकर यांची लायकी नसताना टीका करत आहे. मुख्यमंत्र्यांनी असल्याच्या गळ्यात पट्टा घालावा. राजकारणात असली नीच परिस्थिती आहे. वाळवा तालुका पेटून उठल्यावर प्रशासनास आवरता येणार नाही. जतमधील अभियंताच्या आत्महत्या झाल्यावर चौकशी झाली पाहिजे, याची मागणी केली आहे. परंतु, अजून गुन्हा दाखल झाला नाही. आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करुन प्रशासनाचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पडळकर यांचा राजीनामा घ्यावा.
संजय पाटील म्हणाले, ‘अवधूत वडर आत्महत्या प्रकरणाला बगल देण्यासाठी आमदार पाटील यांच्या कुटुंबावर टीका केली जात आहे. याला जबाबदार आहे. आमदार पाटील यांचे राजकारणात तुझ्या वयापेक्षा जास्त आहे. आता राजकारणात येऊन लायकी नसताना आमदार पाटील यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रमुख नेत्यांना आव्हान देतो म्हणून आमदार पाटील यांच्यावर टीका करण्यास हे मागे लावले आहे’.
आता आमचा संयम संपला
माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे म्हणाले, ‘आता राजकारणात आला आहे. शिक्षकांचा मुलगा म्हणतो पण हा शिक्षकांचा नसावा. याने बिरोबाची खोटी शपथ घेतली आहे. या धनगर समाजाची हानी झाली आहे. आमदार जयंतराव पाटील यांची त्याने माफी मागावी’.