जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा
Sangli News: राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या तयारीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश कऱण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या बुधवारी (१७ जून) त्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी विजय बंगल्यावर जयश्री पाटील यांची भेट घेतली. त्यापूर्वी रात्री उशिरापर्यंत त्यांची मदनभाऊ पाटील यांच्या गटाशी चर्चा सुरू होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जयश्री पाटील यांनी मोबाईलवरून चर्चा केली आणि भाजप प्रवेशाचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी ‘विजय’ बंगल्यावर जयश्री पाटील यांची भेट घेतली. त्याआधी रविवारी रात्री उशीरापर्यंत मदनभाऊ गटाशी भाजप नेत्यांनी चर्चा सुरू होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जयश्री पाटील यांची मोबाईलवरून चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
Firecracker Factory Blast: मोठी बातमी! फटाक्यांच्या अवैध कारखान्यात भीषण स्फोट; 6 कामगार ठार
यासंदर्भात बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसने आम्हाला निलंबित केलं होतं. त्यानंतर आम्हाला कोणत्यातरी पक्षात जाणे गरजेचे होते. राष्ट्रीय पक्षात प्रवेश करण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या मताचा आदर करत आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला आहे.
तर चंद्रकात पाटील म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण केलं. तळागाळातील माणसाच्या विकासासाठी त्यांनी काम केलं. त्याचा स्वभाव भाजपच्या स्वभावाशी मिळताजुळता आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील जयश्री पाटील या भाजपमध्ये चांगले काम करतील.
लक्षणीय बाब म्हणजे, वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील जयश्री पाटील या भाजपमध्ये प्रवेश कऱणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत . यापूर्वी माजी मंत्री प्रतीक पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. पण नंतर त्या फोल ठरल्या. त्याच दरम्यान खासदार विशाल पाटील यांनाही भाजप प्रवेशाच्या ऑफर्स असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर वसंतदादा पाटील यांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी मदन पाटीलही त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले. मात्र, 2004 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारत मंत्रीपदही भूषवले. 2015-16 मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी त्यांच्या गटाचे नेतृत्व स्वीकारले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दिल्याने काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
आता जयश्री पाटील यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. हा प्रवेश काँग्रेस तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. त्याचबरोबर आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि बळ निर्माण करणारा ठरू शकतो.