भाजपमध्ये निष्ठावंत आक्रमक; कार्यालयामध्ये इच्छुकांची गर्दीच गर्दी(फोटो - सोशल मीडिया)
पुणे / दीपक मुनोत : महानगरपालिका निवडणूक रंगू लागली आहे. इच्छुक उमेदवारांचे पक्षाकडे अर्ज, त्यानंतर मुलाखती असे कार्यक्रम भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांमध्ये होत आहेत. इच्छुकांच्या हालचालींना जोर आल्याने शहरही हळूहळू निवडणुकमय होऊ लागले आहे.
भाजप असो, अथवा काँग्रेस असो एरवी या पक्षांच्या कार्यालयात शुकशुकाट असतो. कार्यालय सचिव आणि एक, दोन जणांचा स्टाफ एवढेच लोकं तिथे असतात. शहराध्यक्ष पार्टी ऑफिसमध्ये आले तर तुरळक लोकांची गर्दी होते. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या औपचारिक प्रसंगी पार्टी कार्यालयात थोडी गर्दी दिसते. मात्र, निवडणुका आल्या की, पक्ष कार्यालयांमध्ये वर्दळ वाढते.
याही वेळी हेच चित्र भाजप आणि काँग्रेस कार्यालयात आहे. इच्छुकांच्या मुलाखती, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठका या कारणांनी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात गर्दी दिसू लागली आहे. यावेळी सर्वाधिक गर्दी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आढळली. पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार अडीच हजार इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही त्यांच्या कार्यालयात मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही पक्षांची युती होईल, असे वारे आहेत. त्यांच्या भेटी-गाठी चालू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही इच्छुकांची गर्दी आहे.
पक्षाच्या कार्यालयांमधील ही गर्दी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुखावणारी आहे. आपण १६३ पैकी १२० जागा जिंकू असा आत्मविश्वास नेत्यांच्या बोलण्यातून जाणवू लागला आहे. त्याचवेळी पक्षात जुन्या कार्यकर्त्यांचा-निष्ठावंता़चा गट स्वाभाविकपणे आकाराला येत आहे.
महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीच्या सहा महिने आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग झाले. मोदी लाटेचा हा परिणाम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार संजय काकडे यांना या इन्कमिंगचे श्रेय दिले जात होते. त्यावेळीही उमेदवारी वाटपानंतर पक्षातील निष्ठावंतांनी कोथरूडमधील एक, दोन प्रभागात बंडाचे निशाण उभारले होते. छत्रपती संभाजी उद्यानासमोरील पक्ष कार्यालयात त्यावेळी एका नेत्याची गाडी कार्यकर्त्यांनी अडवून धरली होती आणि घोषणाबाजी केली होती. मात्र, त्यावेळी निष्ठावंतांचा आवाज क्षीण ठरला. बंड दोनच दिवसांत मावळले.
या निवडणुकीत मात्र, इन्कमिंगच्या विरोधात पक्षांतर्गतच छुपा संघर्ष चालू आहे. माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या पक्ष प्रवेशावरून पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतच शाब्दिक चकमकी झाल्या, अशा बातम्या आहेत. शांत स्वभावाचे आमदार भीमराव तापकीर यांनी दोडके यांच्या पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध केला. २०२४ ची विधानसभा निवडणूक दोडके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढविली होती. त्यामुळे दोडके यांच्या पक्ष प्रवेशाला तापकीर यांचा विरोध अपेक्षितच होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे दोडके यांच्या पक्ष प्रवेशाला अनुकूल होते, अशी चर्चा आहे.
याचबरोबर आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा बातम्या अनेकवेळा प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, अजूनही त्यांचे पक्ष प्रवेश झालेले नाहीत. हे पक्ष प्रवेश लांबण्यामागे निष्ठावंतांचा आक्रमक विरोध हे कारण आहे का? ते तपासावे लागेल.
इतर पक्षातील अनेक नेते-कार्यकर्ते भाजपमध्ये
गेल्या दहा, पंधरा वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. पक्षात त्यांचे स्वागतही करण्यात आले. या गर्दीत आपण हरवले जावू, अशी भीती निष्ठावंतांच्या मनात आहे. सदाशिव पेठेतील एका निष्ठावान इच्छुकाला तर यूट्यूबवर मुलाखत देताना रडू आले.
प्रतिक्रिया सौम्य व्हाव्या म्हणून पक्षातील फळीचे काम
नव्याने आलेल्या लोकांपुढे आपला निभाव लागणार नाही, याची बोच त्या निष्ठावंताच्या बोलण्यातून जाणवत होती. ही चुणूक म्हणावी लागेल. पक्षातील उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हा निष्ठावंतांकडून अधिक प्रतिक्रिया उमटतील. भाजपच्या नेत्यांना याची जाणीव आहे. प्रतिक्रिया सौम्य व्हाव्यात त्याकरिता पक्षातील एक फळी काम करत आहे.
हेदेखील वाचा : पालिका निवडणुकीचा वाजला बिगूल ! राजकीय पक्षाची जोरदार तयारी केली सुरु, बैठकांना आले उधाण






