'कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार'; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर लवकरच आणखी एक मंत्री पायउतार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, सध्याच्या सरकारचा कारभार अंधाधुंद असून, त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागत असल्याचे ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. राजकारणासाठी चुकीच्या लोकांचा वापर केल्याचा आरोप ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.
हेदेखील वाचा : Sangli Municipal Election 2025 : सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती
तसेच ठाण्यातील एका व्यक्तीचे नाव थेट अंमली पदार्थांच्या कारखान्याशी जोडले जात असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतीही ठोस दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत गृहमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांकडे निवेदन दिल्याचे सांगत, आता त्यांच्याकडून काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी सजग राहावे
जनतेला आवाहन करत उद्धव म्हणाले, ‘नशिल्या पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी आपण काय करणार आहोत? अशा धंदेवाले आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांना आपण पाठिंबा देणार का?’ महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जनतेने सजग राहून योग्य विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचं वोट जिहाद सुरू
‘मुंबई महानगरपालिका आल्या की ठाकरे सेना आणि काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झालं आहे. ही महानगरपालिका मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे तर दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार आहे’, असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Manikrao Kokate Bail : माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर






