जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता (फोटो - iStock)
अमरावती : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला अखेर न्यायालयाच्या आदेशावरून गती मिळाली आहे. 2017 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसारच यंदाच्या निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे 59 गट आणि पंचायत समितीचे 118 गण कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. पुनर्रचनेचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतर लगेच आरक्षण, मतदारयादी आणि ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात 14 जुलै ते 18 ऑगस्टदरम्यान प्रभागरचना कार्यक्रम राबविण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानंतर आरक्षण निश्चित होणार आहे. आरक्षण आणि मतदार यादीचा कार्यक्रम किमान एक महिना चालल्यास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम आणि नोव्हेंबरमध्ये मतदान प्रक्रिया आटोपण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : “आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका
अमरावती जिल्हा परिषदेसह 14 पंचायत समित्यांमध्ये सध्या प्रशासक आहे. साडेतीन वर्षांपासून राजकीय पदाधिकारी निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मार्च महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले.
प्रभाग रचनेत सदस्य संख्या ५९ वरून ६६
2022 मध्ये जिल्हा परिषदेने केलेल्या प्रभाग रचनेत सदस्य संख्या ५९ वरून ६६ तर पंचायत समित्यांच्या गणाची संख्या ११८ वरून १३२ केली होती. त्यामुळे नेमके कोणत्या संख्येनुसार निवडणुका होणार हा संभ्रम होता. आता शासनाच्या आदेशाने चित्र स्पष्ट झाले आहे. शासनाने २०१७ मधील प्रभागरचना कायम ठेवत निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेक निवडणुका प्रलंबित
राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी 2011 ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.