फोटो - सोशल मीडिया
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणूकीची धामधुम असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आहेत. आज त्यांच्या बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून राज्यातील अनेक नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. त्याचबरोबर ओबीसीमधून मराठा आरक्षण द्यायला नकार देणाऱ्या छगन भुजबळ यांचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला. त्यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर नवीन नेते आले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर अनेकदा टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी आरक्षण देण्याबाबत विश्वास दाखवला असला तरी देखील दगाफटका केल्यास निवडणूकीमध्ये सोडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही मुदद्यांवर भाष्य केले. यावेळी शाळांमध्ये देखील जातीयवाद केला जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. आता बेमुदत उपोषणावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना त्यांच्या या वक्तव्यावरुन सवाल विचारले आहेत.
काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळावरुन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आमचं आंदोलन सुरू असताना राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं. शाळेत गेलो तरी तिथं जातीयवाद गेल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. आता जातीवाद कोण करतोय? मुलांना त्यांनी (भुजबळ समर्थकांनी) काय बोलायचं ते शिकवलं होतं. जातीवादच नाही का? आम्ही काहीही केलं नाही. तरी शाळेपर्यंत जातीवाद गेला असं सांगितलं गेलं. त्याचा कळवळा राज ठाकरेंना आला,” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
पूर्वी बौद्धांचं जसं शोषण झालं तसं आमचं सुरु
पुढे जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांवरुन आणि निर्णायांवरुन प्रश्न केले. तसेच अंतरवली सराटीमध्ये प्रशासनाने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते बंद केले आहेत. यावरुन टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, “आमचा रस्ता बंदच केला. हेच आम्ही केलं असतं तर मराठ्यांनी गरीब जातींना वाळीत टाकलं असं म्हटलं असतं. पाटातून जा म्हणतात. गावातून जाऊ नका असं आम्हाला सांगत आहेत. पूर्वी बौद्धांचं जसं शोषण झालं तसं आमचं झालं. बौद्धांना जसं वाळीत टाकलं जात होतं, तसं आमचं होतंय. दवाखाना, शाळा आणि कॉलेजात जायचे आमचे रस्ते बंद केले आहेत. उद्या कोणी मेलं, काही झालं तर दवाखान्यात जायचं कसं? उद्या आम्ही केलं असतं तर मराठ्यांनी केलं असं म्हटलं असतं. अन्याय झाला म्हणून बोंब मारली असती. हेच आम्ही केलं असतं तर महान योग गुरू, आयुर्वेदाचार्य भुजबळ यांनी थयथयाट केला असता. एखाद्या नाच्यासारखा थयथयाट झाला असता. माझ्या ओबीसीला त्रास दिला असं म्हटलं असतं. आम्ही केलं असतं तर आमच्या जातींना वाळीत टाकलं म्हटलं असतं. आता मराठ्यांना वाळीत टाकलं. सरकार आहे का हे? फडणवीस आणि भुजबळ सरकार चालवतात का?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.






